गोंदिया : तालुक्यातील सालई टोला ते रायपूर या मार्गावर हनसलाल भंडारी पाचे (३७, रा. रायपूर, ता. गोंदिया) याचा अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने डोक्यावर वार करून खून केला. ही घटना २ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास सालई टोला-रायपूर मार्गावर घडली.
प्राप्त माहितीनुसार, रायपूर येथील संजय घरडे (४६) हे गोंदियातील गॅलेक्सी हॉटेलमध्ये काम करतात. ते नेहमीप्रमाणे रात्री घरी परतत असताना रस्त्यावर हनसलाल भंडारी पाचे हा रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळला. हे धक्कादायक दृश्य पाहून त्यांनी तत्काळ गावात जाऊन पोलिस पाटील बिजेवार यांना याची माहिती दिली. पोलिस पाटलासह त्यांच्या घरी जाऊन पत्नी व भावाला माहिती देताच कुटुंबीय घटनास्थळी धावून आले. घटनेची माहिती मिळताच दवनीवाडा पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक वैशाली ढाले व त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी संजय घरडे यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक संजयकुमार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
गोंदियातून केले श्वानाला पाचारण
गोंदिया येथून श्वान घेणाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. परंतु ते श्वान तिथल्या तिथेच फिरले. रात्री पाऊस आल्याने श्वान दूरवर जाऊ शकला नाही.
एकाच्या घरी आढळले रक्ताचे डाग
गावातीलच एकाच्या अंगणात रक्ताचे डाग आढळले आहेत. पोलिस चहूबाजूंनी या घटनेचा तपास करीत आहेत. ज्यांच्याकडे तो मजुरीचे काम करीत होता त्यांच्याच घरी रक्ताचे डाग आढळले. परंतु त्या व्यक्तीसोबत त्याचे जिव्हाळ्याचे संबंध होते असेही सांगितले जाते. रात्रीची घटना असल्याने मदत मागण्यासाठी तर तो त्यांच्या घरी गेला नाही, अशी चर्चा परिसरात आहे.
तपासासाठी सहा पथके
मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी दवनीवाडा पोलिसांनी तीन शोध पथके, तर स्थानिक गुन्हे शाखेने तीन पथके गठित केली आहेत. काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मात्र अद्याप आरोपींचा ठावठिकाणा लागलेला नाही. पोलिसांची सहा पथके आरोपींचा शोध घेत आहेत.