दीड हजाराची लाच घेताना सहायक महसूल अधिकारी जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 01:55 IST2026-02-14T01:54:53+5:302026-02-14T01:55:13+5:30
संदेश बोरकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, ही कारवाई शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास देवरी तहसील कार्यालयात करण्यात आली.

दीड हजाराची लाच घेताना सहायक महसूल अधिकारी जाळ्यात
देवरी (गोंदिया) : येथील तहसील कार्यालयात कार्यरत असलेल्या एका सहायक महसूल अधिकाऱ्याला दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. संदेश बोरकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, ही कारवाई शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास देवरी तहसील कार्यालयात करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार हे देवरी येथील रहिवासी असून त्यांच्या लेआऊट संदर्भात उच्च न्यायालयात एक रिट याचिका दाखल आहे. या याचिकेचा अहवाल सादर करण्यासाठी आरोपी संदेश बोरकर, सहायक महसूल अधिकारी, याने तक्रारदाराकडे दीड हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याप्रकरणी गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार नोंदवली. प्राप्त तक्रारीची दखल घेत एसीबीच्या पथकाने शुक्रवारी तहसील कार्यालय परिसरात सापळा रचला.
रात्री ८ वाजता तहसीलमध्ये कारवाई
शुक्रवारी दिवसभर कार्यालयाचे कामकाज आटोपल्यानंतर रात्री ८ वाजेच्या सुमारास जेव्हा तक्रारदाराने ठरलेली लाचेची रक्कम संदेश बोरकर याला दिली, त्याच वेळी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. आरोपीकडून लाचेची रक्कम जप्त करण्यात आली असून, त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
महसूल विभागात खळबळ
तहसील कार्यालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी आणि तेही रात्रीच्या वेळी ही कारवाई झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदियाच्या चमू ने केली आहे.