कृषी सहायकास कृषी विभागाचे अभयदान

By Admin | Updated: May 27, 2014 00:57 IST2014-05-27T00:57:28+5:302014-05-27T00:57:28+5:30

तिरोडा तालुका कृषी विभागांतर्गत कृषी सहायकाच्या तक्रारीवरुन दोन वर्षापूर्वी बोदा क्षेत्राचे काम हिसकावून तालुका कृषी कार्यालयात बसविण्यात आले.

Abhiyanan of Agriculture Department Agriculture Assistant | कृषी सहायकास कृषी विभागाचे अभयदान

कृषी सहायकास कृषी विभागाचे अभयदान

काचेवानी : तिरोडा तालुका कृषी विभागांतर्गत कृषी सहायकाच्या तक्रारीवरुन दोन वर्षापूर्वी बोदा क्षेत्राचे काम हिसकावून तालुका कृषी कार्यालयात बसविण्यात आले. तेव्हापासून शेतकर्‍यांच्या कामाच्या नावे वेतन काढून कार्यालयाची कामे करवून घेतली जात आहेत. शेतकर्‍यांच्या सेवेकरिता असणारा कृषी सहायक शेतकर्‍यांची आणि शासनाची फसवणूक करीत असून यात वरिष्ठांकडूनही त्यांना अभय दिल्या जात असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. तिरोडा मंडळ कृषी कार्यालयांतर्गत बोदा क्षेत्राचा कारभार कृषी सहायक के.यू. रहांगडाले यांच्याकडे होता. या क्षेत्रात असताना या कृषी सहायकाच्या अनेक तक्रारी होत्या. यावेळी तिरोडा कृषी विभागसुद्धा या कर्मचार्‍यामुळे त्रासून गेलेला होता. तत्कालिन तालुका कृषी अधिकारी चिमलवार यांच्या हस्तक्षेपाने कृषी सहायक के.यू. रहांगडाले यांना क्षेत्राचे कामे काढून तालुका कृषी कार्यालयात पदस्थापित करण्यात आले. त्यांच्या कार्याची व तक्रारींची लेखी माहिती व अहवाल जिल्हा कृषी कार्यालय गोंदिया आणि नागपूर येथे पाठविण्यात आला. मात्र अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. कृषी सहायकाचे पद शेतकर्‍यांच्या मदतीकरिता आणि शेतकर्‍यांना कृषी विषयक मार्गदर्शनाकरिता आहे. शासन त्याकरिता वेतन देते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कृषी सहायक के.यू. रहांगडाले शेतकर्‍यांच्या नावे अर्थात कृषी सहायकाचे वेतन घेतात आणि तालुका कृषी कार्यालयाचे काम कार्यालयात बसून सांभाळतात. या कर्मचार्‍यांना तालुका कृषी अधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी यांचे अभयदान असून शासनाची आणि शेतकर्‍यांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. बोदा क्षेत्रांतर्गत बंधार्‍याच्या कामात अनियमितता, शेतकर्‍यांच्या योजनेत घोळ, बेरडीपार व डब्बेटोला बंधार्‍याच्या कामात घोळ व भ्रष्टाचार अशा अनेक तक्रारी असल्याने क्षेत्राचे काम काढून त्यांना कार्यालयात बसविण्यात आले. तेव्हापासून कृषी सहायक के.यू. रहांगडाले कृषी सहायकाचा वेतन घेतो आणि शेतकर्‍यांना कसलीही सेवा देत नाही. विश्वस्त सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कृषी सहायक के.यू. रहांगडाले यांचे वेतन बोदा क्षेत्रातून काढल्या जात आहे. बोदा क्षेत्रातून वेतन काढले जात असल्याने शेतकर्‍यांची फसवणूक होत आहे. बोदा क्षेत्रातून त्यांना दोन वर्षापूर्वी हटविण्यात आले तरी त्यातून वेतन काढणे चुकीचे आहे. मोफतचे वेतन कृषी विभाग देत आहे, असे बोलले जाते. यात कृषी सहायकाची चूक नसून तालुका कृषी अधिकारी तिरोडा आणि जिल्हा कृषी अधिकारी गोंदिया यांची चूक असून तेच अभयदान देत असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे. कृषी सहायक असताना बोदा क्षेत्रात दोन वर्षांपासून स्थायी कृषी सहायक नसून या क्षेत्राचा प्रभार कृषी सहायक खंडाईत सांभाळत आहेत. दोन वर्षांपूर्वी के.यू. रहांगडाले यांच्या तक्रारी करण्यात आल्या. वर्तमानपत्रात अनेक बातम्या प्रकाशित झाल्या. मात्र तालुका कृषी अधिकार्‍यांनी कसलीही कारवाई केलेली नाही. कृषी सहायक रहांगडाले यांचे वेतन बोदा क्षेत्रातून कोणत्या आधारावर काढले जाते. तिरोडा येथे पदस्थापना असल्याने घरभाडे कसे देय आहे आणि दौर्‍यांकरिता १२०० रुपये देण्यात येतात का व कसे? याची माहिती काढली जात आहे. (वार्ताहर)

Web Title: Abhiyanan of Agriculture Department Agriculture Assistant