११ जहाल नलक्षवाद्यांचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण; हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीला हादरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 21:07 IST2025-11-28T21:06:32+5:302025-11-28T21:07:35+5:30
मुदतीपूर्वीच केले आत्मसमर्पण...

११ जहाल नलक्षवाद्यांचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण; हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीला हादरा
गोंदिया : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (माओवादी) महाराष्ट्र-मध्य प्रदेश-छत्तीसगड विशेष क्षेत्रीय समितीने आत्मसमर्पणासाठी १ जानेवारी २०२६ ची मुदत मागितली होती. प्रवक्ता अनंत याने यासंदर्भात २७ नोव्हेंबरला पत्रक जारी केले होते; पण त्यापूर्वीच महाराष्ट्र-मध्य प्रदेश-छत्तीसगड विशेष क्षेत्रीय समितीचा प्रवक्ता अनंत याच्यासह दरेकसा दलमच्या ११ जहाल नक्षलवाद्यांनी शुक्रवारी (दि.२८) राेजी सायंकाळी गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे.
महाराष्ट्र-मध्य प्रदेश-छत्तीसगड (एमएमसी) विशेष क्षेत्रीय समितीचा प्रवक्ता अनंत याने २४ नोव्हेंबरला आत्मसमर्पणाची तयारी दर्शवत १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत मागितली होती. यानंतर छत्तीसगडचे गृहमंत्री विजय शर्मा यांनी ‘सरकारकडे अधिक वेळ नाही, माओवाद्यांनी विना विलंब शस्त्रे टाकून आत्मसमर्पण करावे’ असे स्पष्टीकरण दिले होते. यानंतर २७ नोव्हेंबरला माओवाद्यांनी नवे पत्रक जारी करत १ जानेवारी रोजी सर्व जण शस्त्रत्याग करून मुख्य प्रवाहात येऊ, असे जाहीर केले होते. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी गोंदिया पोलिसांशी संपर्क साधून शुक्रवारी (दि.२८) सायंकाळी अनंतसह ११ जहाल नलक्षवाद्यांसह आत्मसमर्पण केले. याला गोंदिया पोलिस जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी दुजोरा दिला, तसेच यासंदर्भातील शनिवारी (दि.२९) माहिती देणार असल्याचे सांगितले.
‘पीएलजीए’ सप्ताह न पाळण्याचे आवाहन -
प्रवक्ता अनंत याने पीएलजीए सप्ताह न साजरा करण्याचा निर्णयही पत्रकात स्पष्ट केले होते. शस्त्रसमर्पणासाठी सर्व कार्यकर्त्यांनी संपर्कात राहावे, एकत्र निर्णय घ्यावा व व्यक्तिगत शरणागती टाळावी, असेही निर्देश दिले होते. यापूर्वी शरणागती स्वीकारलेल्या सोनू ऊर्फ भूपती व सतीश यांनी या वाटाघाटीत मध्यस्थी करण्याची अपेक्षाही त्याने व्यक्त केली होती.
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळ कमकुवत -
जहाल नलक्षवादी हिडमा हा काही दिवसांपूर्वी चकमकीत ठार झाला होता. तेव्हापासून नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला असून नक्षल चळवळ आता पूर्णपणे कमकुवत झाली आहे. त्यामुळेच १ जानेवारीपर्यंत आत्मसमर्पणाची तयारी दर्शविणाऱ्या अनंतने मुदतीपूर्वी शस्त्र ठेवीत दरेकसा दलमच्या ११ नलक्षवाद्यांसह गोंदिया पोलिसांसमोर शुक्रवारी आत्मसमर्पण केले.