लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : काँग्रेसने अकरा उमेदवारांची यादी जाहीर करताच आरजीने आक्रमक भूमिका घेतली असून विरोधकांच्या आघाडीला घरघर लागल्याचे दिसून येत आहे. मित्रपक्षांना विश्वासात न घेताच काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केले ही बाब धक्कादायक असल्याची संतप्त प्रतिक्रिया आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी दिली. ही निव्वळ फसवणूक असून काँग्रेसचे हे कोणते षडयंत्र?, असा सवालही त्यांनी केला असून आरजीच्या उत्तर आणि दक्षिण गोवा निवडणूक समित्यांच्या बैठकाही तातडीने बोलावण्यात आल्या. जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसने ११ उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामुळे काही मतदारसंघांमध्ये मोठी रंगत वाढणार आहे.
चिंबलमध्ये महिला राखीव मतदारसंघात अॅड. सेजल सुदेश कळंगुटकर भाजप उमेदवाराला आव्हान ठरतील. हा जि. पं. मतदारसंघ सांताक्रूझ विधानसभा मतदारसंघात येतो. चिंबल झोपडपट्टीत काँग्रेसची पारंपरिक मते आहेत. रुडॉल्फ फर्नाडिस हे २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत येथे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. भाजप उमेदवारासाठी आता त्यांना बरेच कष्ट घ्यावे लागतील.
कळंगुट हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या विधानसभा निवडणुकीत मायकल लोबो हे काँग्रेसच्या तिकिटावरच येथे निवडून आले होते. काँग्रेसने या महिला राखीव मतदारसंघात कार्मेलिना आंजेला फर्नाडिस यांना उमेदवारी दिली असून त्या भाजप उमेदवाराला टक्कर देऊ शकतील का? हे पाहणे उत्कंठेचे ठरेल. उसगाव-गांजे मतदारसंघात काँग्रेसने मनिषा उसगावकर यांना उमेदवारी दिल्याने तिथे रंगतदार लढत होणार असून या मतदारसंघाकडे लोकांचे लक्ष आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना या मतदारसंघात भाजप उमेदवाराला निवडून आणण्यासाठी कष्ट घ्यावे लागतील. वेळ्ळी मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध आप लढत होणार आहे. या खुल्या मतदारसंघात ज्युलिओ फर्नाडिस यांना काँग्रेसने तिकीट दिली आहे. आपचे क्रुझ सिल्वा हे येथे आमदार आहेत. आपने येथे पहिल्याच यादीत इसाका फर्नाडिस यांना तिकीट दिली आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी सिल्वा यांना जादा परिश्रम घ्यावे लागतील.
मतदारसंघात काँग्रेसचे आलेक्सिन कुडतरीत ओबीसी राखीव डिसिल्वा यांचे भाजप उमेदवाराला आव्हान ठरणार आहे. येथील अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांना भाजप उमेदवाराला मते मिळवून देण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागतील. तसेच रेइश मागुश महिला राखीव मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार सोनल मालवणकर या भाजप उमेदवारासाठी आव्हान ठरणार आहेत. तिथे आमदार केदार नाईक यांनी भाजप उमेदवाराला निवडून आणण्यासाठी कसोटी लागेल.
दुसऱ्या दिवशी केवळ एक अर्ज दाखल
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुसऱ्या दिवशी दक्षिणेत वेळ्ळी जिल्हा पंचायत मतदारसंघातून केवळ एक अर्ज सादर करण्यात आला. उत्तर गोव्यातील एकाही जि. पं. मतदारसंघातून अर्ज आलेला नाही. वेळ्ळी मतदारसंघातून अर्ज भरलेल्या उमेदवाराचे नाव जॉन बेदा पेद्र परैरा असे असून त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे.
आप उमेदवाराचे बॅनर फाडले
पेन्ह द फ्रान्स जिल्हा पंचायत मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या आम आदमी पक्षाचे उमेदवार अरविंद तेंडूलकर यांचे बॅनर अज्ञात व्यक्तींनी फाडल्याची घटना घडली आहे. तेंडूलकर म्हणाले, निवडणुकीच्या निमित्ताने सध्या आपण घरोघरी जाऊन प्रचार करत आहे. यावेळी लोकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. हे पाहूनच काहींनी भीतीपोटी आपले बॅनर फाडल्याचा आरोप त्यांनी केला.
काँग्रेसने थट्टाच केली : परब
काँग्रेसने उमेदवार जाहीर करताच आरजीचे नेते मनोज परब यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काँग्रेसने आम्हाला शेवटपर्यंत झुलवत ठेवले. सोमवारी दुपारी साडेचार वाजता त्यांची बैठक होती. त्या बैठकीनंतर आम्हाला कळवतो, असे सांगितले होते. परंतु काहीच संदेश आला नाही. एका व्यासपीठावर उमेदवार जाहीर व्हायला हवे होते. परंतु स्वतंत्रपणे उमेदवार जाहीर करत काँग्रेसने आमची थट्टा केल्याचेही परब म्हणाले. या सर्व घटनेमध्ये आरजीचे नुकसान झालेले आहे. युती तुटल्यास आरजीला नुकसान होणार आणि आम्ही कार्यकर्त्यांना काय उत्तर द्यायचे? जे काही घडले आहे त्यावर आरजीच्या उत्तर आणि दक्षिण निवडणूक समितीची बैठक आम्ही आज, बुधवारी घेणार आहोत व त्यानंतर आमचा निर्णय जाहीर करणार आहोत, असेही परब यांनी सांगितले.
दत्त जयंती दिवशी यादी जाहीर करणार : सरदेसाई
जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी गोवा फॉरवर्ड पक्ष उमेदवारांची यादी दत्त जयंतीदिनी घोषित करणार आहे. त्यापूर्वी काँग्रेस पक्षाशी जे काही बोलणे आहे ते होईल, अशी माहिती गोवा फॉरवर्डचे नेते आमदार विजय सरदेसाई यांनी दिली. काँग्रेस व आरजीच्या नेत्यांची भेट मी घडवून आणली आणि आम्ही युती पाळली. पण मध्यंतरी आम्हाला बाजूला ठेवून आरजी व काँग्रेस यांच्यात चर्चा सुरू झाली. माझी काँग्रेससोबत २०२२ पूर्वीपासून युती आहे. मात्र, आता झेडपी निवडणुकीसाठी आघाडीची चर्चा सुरू असताना काँग्रेसने आम्हाला विश्वासात न घेता परस्पर उमेदवारांची यादी घोषित केली, हे धक्कादायक असल्याचे आमदार सरदेसाई म्हणाले.
भाजपचे आणखी दहा उमेदवार जाहीर
भाजपने आणखी दहा उमेदवारांची आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. उत्तरेत हरमल, शिवोली, हळदोणे, हणजूण, चिंबल व सेंट लॉरेन्स या ६ तर दक्षिणेत धारबांदोडा, रिवण, बार्से, पैंगीण या ४ मतदारसंघात तिकिटे घोषित करण्यात आली आहे. आतापर्यंत पक्षाकडून एकूण २९ उमेदवार जाहीर झालेले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आठ उमेदवारांची तिसरी यादी आज, बुधवारी अपेक्षित असून त्यानंतर चौथ्या यादीत आणखी चार ते पाच उमेदवार जाहीर केले जातील व उर्वरीत जागांवर भाजपकडून अपक्षांना पाठिंबा दिला जाण्याची शक्यता आहे.
Web Summary : Congress' candidate list sparked RG's anger, threatening the opposition alliance. Seat sharing disagreements and unilateral announcements fuel potential split before the ZP elections. BJP announces more candidates.
Web Summary : कांग्रेस की उम्मीदवार सूची से आरजी नाराज, विपक्षी गठबंधन खतरे में। सीट बंटवारे पर असहमति और एकतरफा घोषणाओं से जेडपी चुनाव से पहले विभाजन की संभावना बढ़ गई है। बीजेपी ने और उम्मीदवारों की घोषणा की।