प्राथमिक स्तरावरच विद्यार्थ्यांना रोबोटिक्सचे शिक्षण देऊ: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 09:28 IST2025-07-20T09:28:00+5:302025-07-20T09:28:55+5:30
साखळी येथे स्टीम लॅब उपक्रमाचे उद्घाटन : शिक्षणात क्रांती घडविण्यासाठी सरकार सज्ज

प्राथमिक स्तरावरच विद्यार्थ्यांना रोबोटिक्सचे शिक्षण देऊ: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली :गोवा सरकार शिक्षण क्षेत्रात नावीन्यपूर्ण बदल घडवत आहे. त्यामुळे प्राथमिक स्तरावरच विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्राचा वापर करावा, यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. त्यासाठी शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना डिजिटल तंत्रज्ञान व रोबोटिक्सचे धडे देण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर स्टीम लॅब व इतर माध्यमातून आधुनिक तंत्र मुलांना विकसित करण्याची संधी मिळावी हा आमचा संकल्प आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
साखळी येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात शनिवारी स्टीम लॅबच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, स्टीम लॅब अंतर्गत नव्या शैक्षणिक धोरणात अनेक सुविधा प्राथमिक स्तरापासून उपलब्ध करण्याचा सरकारचा उद्देश आहे. यामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती सहजपणे मिळणे शक्य होणार आहे. विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञानाचे योग्य वेळेत धडे दिले तर त्यांच्या माध्यमातून विकसित भारत २०४७ च्या स्वप्नाची पूर्ती होणार आहे.
शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी सरकार वेगवेगळे प्रयोग करीत आहे. कौशल्य विकसित करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर बालमनावर रुजवण्यासाठी सरकारने अनेक योजना आखल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी सुभाष शिरोडकर यांनीही मार्गदर्शन केले. साखळी, शिरोडा व आसपासच्या भागातील विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.