दूध उत्पादकांचे सर्व प्रश्न सोडवू; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली हमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 08:23 IST2026-01-15T08:22:32+5:302026-01-15T08:23:00+5:30
शेतकऱ्यांकडून विधानसभा संकुलात भेट, निवेदन सादर

दूध उत्पादकांचे सर्व प्रश्न सोडवू; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली हमी
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : दूध उत्पादक शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्याची आपल्याला पूर्ण जाणीव असून महिनाभरात त्यावर सर्व समावेशक तोडगा काढणे थकबाकी वितरित करणे व इतर सर्व बाबतींत पूर्णपणे दिलासा देण्यात येईल, अशी हमी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिली.
राज्यातील दूग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दूध आधार आणि खरेदी किमतींमध्ये सुधारणा करण्यात यावी, दुधाच्या आधारभूत किमतीत वाढ करण्यात यावी, सहकारी संस्थांकडून दूध खरेदीच्या किमती वाढवण्यात याव्यात आदी मागण्या संदर्भात दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी विधानसभा संकुलात भेट घेऊन निवेदनाद्वारे आपल्या विविध मागण्या सादर केल्या. तसेच एकूणच दूध व्यवसाय शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्याची माहिती अध्यक्ष वैभव परब, प्रमोद सिद्धये यांनी दिली. या वेळी आदिनाथ परब, नितीन पिळर्णकर, गोविंद नाईक, संतोष गावस उपस्थित होते.
दुग्ध व्यवसाय हा गोव्याच्या शेतीचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो हजारो कुटुंबांना उपजीविका प्रदान करतो आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करतो. गोवा सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी पावले उचलली असली तरी, अलीकडच्या आव्हानांमुळे त्यांच्या व्यवसायाच्या व्यवहार्यतेला धोका निर्माण झाला आहे, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.
पशूखाद्य, चारा आणि मजुरांच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या वाढत्या किमतींशी जुळवून घेण्यासाठी सध्याच्या दुग्ध आधार आणि खरेदी किमतींमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या नाहीत. यामुळे लहान दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्थिर राहणे कठीण झाले आहे. याव्यतिरिक्त राज्यातील सहकारी संस्थांकडून दूध खरेदी किमती शेजारच्या राज्यांपेक्षा लक्षणीयरीत्या कमी आहेत. त्याबाबत तातडीने विचार करण्याची मागणी या वेळी शेतकऱ्यांनी केली.
या किमतीमध्ये सुधारणा केल्याने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल, दुग्ध व्यवसायात तरुणांचा सहभाग वाढेल आणि स्थानिक दूध उत्पादनात होणारी घट रोखता येईल.
हे 'स्वयंपूर्ण गोवा' उपक्रमांतर्गत स्वावलंबनाला चालना देण्यासाठी आणि स्थानिक समुदायांना बळकट करण्यासाठी सरकारच्या उद्दिष्टांशी देखील सुसंगत असेल, असेही शेतकऱ्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. निवेदनाच्या प्रति पशु संवर्धन मंत्री व खात्यालाही सादर केल्या आहेत.
मुख्यमंत्री सकारात्मक : आमदार शेट्ये
आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवणे गरजेचे असून, धवलक्रांतीसाठी तरुणांना सामावून घेणे तसेच इतर बाबतीत ज्या त्रुटी आहेत, दर वाढ, नियमित आधारभूत किमतीचे वितरण या सर्व बाबतीत मुख्यमंत्री डॉ. सावंत पूर्ण सकारात्मक असून, महिनाभरात सर्व बाबतीत योग्य विचार होईल, अशी हमी मुख्यमंत्र्यांनी दिल्याचेही त्यांनी सांगितले.