संघाच्या कार्यामुळेच देशात स्थिरता; पणजीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 10:50 IST2025-10-06T10:48:48+5:302025-10-06T10:50:12+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रविवारी आझाद मैदानावर आयोजित केलेल्या विजयादशमी उत्सवामध्ये प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते.

संघाच्या कार्यामुळेच देशात स्थिरता; पणजीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देश तंत्र झाल्यानंतर राष्ट्रप्रेम निर्माण करण्यासाठी काम केले आणि ते आजवर चालूच ठेवले. संघामुळेच देशात स्थिरता आहे. संघाने कधीच जाती, धर्म आणि प्रांत यामध्ये भेदभाव केला नाही. केवळ राष्ट्र प्रथम हेच ध्येय घेऊन संघाने काम केले, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यागोवा राज्याचे सार्वजनिक तक्रार विभागाचे संचालक प्रसाद वळवईकर यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रविवारी आझाद मैदानावर आयोजित केलेल्या विजयादशमी उत्सवामध्ये प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. सन्मानीय पाहुणे म्हणून कोकण प्रांतचे संघचालक अर्जुन (बाबा) यशवंत चांदेकर, महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर, उत्पल पर्रीकर, नगरसेवक वसंत आगशीकर संघाचा गणवेश परिधान करून सहभागी होते.
शेजारील देशांची स्थिती पाहता आमच्या देशातील स्थिरता आम्हाला जाणवते. त्या देशांमध्ये संघ असला असता तर त्यांची ही स्थिती झाली नसती. भारतात संघ आहे म्हणून अशा परिस्थिती कधीच निर्माण होणार नाही, हे सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. देशात प्रत्येक ठिकाणी संघाची शाखा आहे. याच शाखेच्या माध्यमातून संघ समाजात चांगले काम करीत आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनाही संघाने घडविले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनाही घडविले आहे. शक्ती आणि संयम या दोन्हींचे एकत्र असणे, हे समाज हिताच्या दृष्टीने आवश्यक आहे. संयम असेल तर शक्ती शोभून दिसते आणि शक्ती असेल तर संयम अधिक प्रभावी ठरतो, असे वळवईकर यांनी सांगितले.
संघामुळेच झाले चांगले संस्कार : उत्पल पर्रीकर
उत्पल पर्रीकर म्हणाले, की लहानपणापासून मी संघाच्या शाखेवर जायचो. कुटुंबीयांनी माझ्यावर संस्कार केलेच, पण संघाचाही माझ्यावर झालेल्या चांगल्या संस्कारात मोठा वाटा आहे. संघामुळेच माझ्यातील राष्ट्रप्रेम जागृत झाले आणि संघामुळेच मी चांगला व्यक्ती बनू शकलो.
संघातील शिस्त पाहून प्रभावित झालो : मंत्री बाबूश मोन्सेरात
मंत्री मोन्सेरात म्हणाले, की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मला विजयादशमीचा उत्सव पाहण्यास बोलाविले होते, संघाच्या शिस्तीने मी भारावून गेलो. मी बारकाई संघाच्या गोष्टी पाहिल्या. लहान मुलापासून ज्येष्ठांपर्यंत सर्वचजण या मोठ्या संघटनेमध्ये आहेत. एक पिढी ते एक पिढीपर्यंत असा त्यांचा आतापर्यंत प्रवास राहिला आहे. मला खात्री आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा येणाऱ्या अनके पिढीपर्यंत आणि दशकांपर्यंत असाच राहील.