धोंडासाठी दोन स्वतंत्र रांगा; देवी लईराई जत्रोत्सवाची नियोजनबद्ध तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 07:28 IST2026-04-14T07:27:00+5:302026-04-14T07:28:03+5:30
तब्बल ९२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर; मंदिर परिसरात स्टॉल, दुकाने लावण्यास मनाई, जत्रेवेळी शिस्त पाळण्याचे देवस्थान समितीचे आवाहन

धोंडासाठी दोन स्वतंत्र रांगा; देवी लईराई जत्रोत्सवाची नियोजनबद्ध तयारी
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : शिरगाव येथील देवी लईराईच्या २१ रोजी होणाऱ्या जत्रोत्सवावेळी कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. होमखंड ते मंदिरापर्यंत ९२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यंदा धोंडांसाठी दोन स्वतंत्र रांगा असतील, अशी माहिती लईराई देवस्थान समितीचे अध्यक्ष दीनानाथ गावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गावकर म्हणाले की, देवी लईराईच्या जत्रेला येण्याबाबत कोणावरही निर्बंध नाहीत. भाविकांनी देवीच्या जत्रेसाठी मोठ्या संख्येने येऊन दर्शन घ्यावे. मात्र प्रत्येकाने शिस्त पाळावी. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना सोबत ठेवावे, त्यांना गर्दीत एकटे सोडू नये. २२ पासून पुढील चार दिवस कौलप्रसाद होईल.
गावकर म्हणाले, 'मागील वर्षी जत्रेवेळी चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर सरकारने या जत्रेच्या तयारीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्याचे देवस्थान समितीकडून पालन केले जात आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांसमवेत तयारीबाबत आतापर्यंत समितीच्या चार बैठका झाल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष येऊन तयारीचा आढावा घेतला आहे. त्यानुसार ज्या उतारावर चेंगराचेंगरीची घटना घडली होती, तो भाग सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.
रस्ता रुंदीकरण, मंदिर परिसर, होमखंड तसेच आजूबाजूच्या परिसराचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. गावकर म्हणाले की, 'देवस्थान समितीने सुमारे १५ लाख रुपये खर्च करून होमखंड ते मंदिरापर्यंत २२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.
योग्य ठिकाणी बॅरिकेड घातले जातील. जत्रेच्या पहिल्या दिवशी मंदिर परिसरात कुठलीही दुकाने थाटली जाणार नाहीत. केवळ होमखंडच्या ठिकाणी लिंबू सरबत, चहा, कलिंगड विक्रीची सुरुवातीला नऊ व पुढे २५ अशी ३४ दुकाने असतील.
दुसऱ्या दिवशी दुकानांची संख्या वाढवली जाईल. धोंडांसाठी होमखंडाकडे जाण्यासाठी व तेथून परत येण्यासाठी दोन स्वतंत्र रांगा केल्या जातील. पोलिसांकडून त्याचे व्यवस्थापन केले जाईल. जत्रेसाठी देवस्थानचे १०० स्वयंसेवक पोलिसांना सहकार्य करतील. यावेळी श्री देवी लईराई देवस्थान समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
राज्य महोत्सव दर्जाला महाजनांचा विरोध
देवी लईराईच्या जत्रेला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला जाईल, असे सरकारने नमूद केले होते. मात्र या निर्णयाला महाजनांनी विरोध केला. त्यांचे एकमत न झाल्याने देवस्थान समितीने सरकारचा या जत्रेला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव फेटाळला, असे अध्यक्षांनी सांगितले.
२० हजार धोंडांचे अर्ज
श्रीदेवी लईराईच्या जत्रेसाठी धोंडांनी नोंदणी करावी, असे आवाहन देवस्थान समितीने केले होते. त्यानंतर आमच्याकडे २० हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. मात्र काहींचे अर्ज अपूर्ण आहेत. आतापर्यंत सात हजारांहून अधिक धोंडांना ओळखपत्र दिली आहेत. ज्यांनी अर्ज दिला नाही, तेदेखील या जत्रेला येऊ शकतात. त्यावर निर्बंध नाहीत, असे अध्यक्ष दीनानाथ गावकर यांनी सांगितले.