रेल्वेत विनातिकीट प्रवास; वर्षभरात २० कोटींचा दंड; कोकण रेल्वेची ३ लाख ६८ प्रवाशांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 12:25 IST2026-01-10T12:24:32+5:302026-01-10T12:25:14+5:30
प्रामाणिक प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि सुखकर व्हावा, या उद्देशाने रेल्वेने वर्षभर तिकीट तपासणी मोहीम राबवली आहे.

रेल्वेत विनातिकीट प्रवास; वर्षभरात २० कोटींचा दंड; कोकण रेल्वेची ३ लाख ६८ प्रवाशांवर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : कोकणरेल्वे मार्गावर विनातिकीट आणि नियमबाह्य प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चाप लावण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. २०२५ या वर्षभरात तब्बल ३,६८,९०१ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून २०.२७ कोटी रुपयांचा महसूल दंडाच्या स्वरूपात गोळा करण्यात आला आहे.
केवळ डिसेंबर २०२५ या एका महिन्यात ९९८ विशेष तपासणी मोहिमा राबवण्यात आल्या. त्या दरम्यानस विनातिकट प्रवास करणाऱ्या ४३,८९६ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २.४५ कोटी रुपयांचा दंड आणि थकीत रेल्वे भाडे वसूल करण्यात आले आहे.
प्रामाणिक प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि सुखकर व्हावा, या उद्देशाने रेल्वेने वर्षभर तिकीट तपासणी मोहीम राबवली आहे. २०२५ या संपूर्ण वर्षाचा आढावा घेतल्यास ही आकडेवारी थक्क करणारी आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२५ या कालावधीत एकूण ८,४८१ विशेष मोहिमा राबवण्यात आल्या.
ही कारवाई रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या समन्वयाने संपूर्ण कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या आणि स्थानकांवर करण्यात आली. भविष्यातही अशा मोहिमा अधिक तीव्र केल्या जातील, असे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
कोकण रेल्वेने सर्व प्रवाशांना आवाहन केले आहे की, कायदेशीर कारवाई आणि गैरसोय टाळण्यासाठी नेहमी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा.