'विकासासाठी भाजपशिवाय पयार्य नाही'; मांद्रे येथे अटलबिहारी वाजपेयी स्मृती संमेलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 14:12 IST2026-01-04T14:12:10+5:302026-01-04T14:12:59+5:30
मांद्रे पंचायत सभागृहात अटलबिहारी वाजपेयी स्मृती संमेलन मांद्रे भाजप मंडळ आणि भाजप कार्यकर्त्यांनी आयोजित केले होते.

'विकासासाठी भाजपशिवाय पयार्य नाही'; मांद्रे येथे अटलबिहारी वाजपेयी स्मृती संमेलन
लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : देशभरात भारतीय जनता पक्षाने (भाजप) आणि सरकारने चालवलेल्या कार्याला तोड नाही. भाजपशिवाय पर्याय नाही, हे पुन्हा एकदा गोव्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत जनतेने सिद्ध करून दाखवले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच जिल्हा पंचायतीच्या निवडणुका झाल्या आणि दोन्ही जिल्ह्यामधून भाजपला पूर्ण बहुमत मिळाले. त्यामुळे यापुढेही भाजपशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन मांद्रेचे माजी आमदार दयानंद सोपटे यांनी केले.
मांद्रे पंचायत सभागृहात अटलबिहारी वाजपेयी स्मृती संमेलन मांद्रे भाजप मंडळ आणि भाजप कार्यकर्त्यांनी आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, मांद्रे भाजप मंडळ अध्यक्ष पोखरे, माजी अध्यक्ष बाबू परब, पालये सरपंच नेहा गवंडी, धारगळ नवनिर्वाचित जिल्हा पंचायत सदस्य श्रीकृष्ण हरमलकर, पार्से सरपंच मधुसूदन सातार्डेकर, उपसरपंच सौ. पार्सेकर आदी उपस्थित होते.
सुरुवातीला भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी मांद्रे मतदारसंघासाठी भाजपचे अविरतपणे - कार्य केलेल्या ज्येष्ठ तरणी गावकर, रमेश शेट मांद्रेकर, सदानंद मेणकुरकर, देवानंद कुडव व दिगंबर कोरकणकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्प देऊन प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी धारगळचे नवनिर्वाचित भाजपचे जिल्हा पंचायत सदस्य श्रीकृष्ण हरमलकर यांचा पक्षाचे अध्यक्ष दामू नाईक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन गौरव केला.
अटलबिहारी वाजपेयी याचे कार्य तळागाळातील भाजप कार्यकर्त्यांना पोहोचायला हवे. त्यासाठी भाजप वेगवेगळे उपक्रम राबवतो. बिरसा मुंडांचे कार्य आज कुणाला माहीत आहे. त्यांनी केलेले कार्य आजच्या पिढीला कळायला हवे. त्यासाठीच भाजप वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम आयोजित करतात, असे दामू नाईक यांनी सांगितले.