गोव्यातील विद्यार्थ्यांच्या गणित, विज्ञानात लक्षणीय सुधारणा; परख अहवालाचा निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 07:38 IST2025-12-31T07:38:38+5:302025-12-31T07:38:49+5:30
संकल्पनात्मक समज, तर्कशक्ती व समस्या सोडविण्याची क्षमता वाढली

गोव्यातील विद्यार्थ्यांच्या गणित, विज्ञानात लक्षणीय सुधारणा; परख अहवालाचा निष्कर्ष
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: परख २०२४ या राष्ट्रीय मूल्यमापन अहवालानुसार गोव्यातील विद्यार्थ्यांच्या गणित व विज्ञान विषयातील अध्ययन पातळीत लक्षणीय सुधारणा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शाळांमध्ये राबविण्यात येत असलेल्या तंत्रज्ञानाधारित शिक्षण उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची संकल्पनात्मक समज, तर्कशक्ती व समस्या सोडविण्याची क्षमता वाढल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
राज्यात शालेय स्तरावर सुरू असलेल्या कोडिंग व रोबोटिक्स शिक्षण योजनेमुळे गणित व विज्ञान हे विषय विद्यार्थ्यांसाठी अधिक रंजक व व्यवहार्य बनले आहेत. प्रत्यक्ष प्रयोग, उपक्रमाधारित शिक्षण आणि डिजिटल साधनांच्या वापरामुळे विद्यार्थ्यांचा सहभाग वाढला असून अध्ययनातील दरी कमी होत असल्याचे निरीक्षण अहवालात नोंदविण्यात आले आहे.
या शैक्षणिक सुधारणांचा परिणाम राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही दिसून येत आहे. संगणकीय विचारशक्तीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गोव्याच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले असून मोठ्या संख्येतील सहभागी विद्यार्थ्यांमधून अनेक विद्यार्थी अव्वल क्रमांकात आले आहेत. यामुळे गोव्यातील शालेय शिक्षणाची गुणवत्ता अधोरेखित झाली आहे.
परख अहवालातील निष्कर्षांमुळे गोव्यात राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक सुधारणांना बळ मिळाले असून भविष्यासाठी सज्ज पिढी घडविण्याच्या दिशेने राज्य योग्य मार्गावर असल्याचे स्पष्ट होते. गणित व विज्ञान विषयांतील ही सुधारणा शालेय शिक्षण धोरणासाठी सकारात्मक संकेत मानली जात आहे.
गुणवत्तापूर्ण बदल घडविण्यावर भर
केअर्स योजनेच्या सहाव्या सशक्त समितीची बैठक मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. या बैठकीत शाळांमधील कोडिंग व रोबोटिक्स शिक्षणाच्या अंमलबजावणीचा, योजनेच्या शैक्षणिक परिणामांचा आणि भविष्यातील विस्ताराचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शालेय शिक्षणात तंत्रज्ञान व नवोपक्रमाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण बदल घडविण्यावर भर देण्यात आला.