पोलिसांवर दगडफेक करत दरोडेखोर शेतातून पसार; चावडी-काणकोण येथे सराफी दुकान लुटण्याचा प्रयत्न फसला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 12:09 IST2025-11-26T12:08:56+5:302025-11-26T12:09:48+5:30
पाठलाग करणाऱ्या पोलिसांवर त्यांनी दगडफेक केली.

पोलिसांवर दगडफेक करत दरोडेखोर शेतातून पसार; चावडी-काणकोण येथे सराफी दुकान लुटण्याचा प्रयत्न फसला
लोकमत न्यूज नेटवर्क, काणकोण: चावडी येथील प्रवीण मोहन वेर्णेकर यांच्या घराच्या आवारात असलेले एस. एम. ज्वेलर्स हे सराफी दुकान फोडण्याचा प्रयत्न सोमवारी मध्यरात्री अज्ञात दरोडेखोरांनी केला. गस्तीवरील पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न अयशस्वी ठरला. मात्र, पाठलाग करणाऱ्या पोलिसांवर त्यांनी दगडफेक केली.
सराफी दुकानावरील दरोड्यासाठी चोरटे जय्यत तयारी करून आले होते. चोरीसाठी कुदळ (पिकास) व पहार घेऊन आलेल्या चोरट्यांनी सराफ व्यावसायिक वेर्णेकर यांच्या दुकानाच्या शटरची कुलूपे तोडली. काळा स्प्रे फवारून सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा बंद पाडले. दुकानाशेजारीच असलेले वेर्णेकर यांच्या घरातील लोकांना बाहेर येता येऊ नये, यासाठी त्यांनी घराचा मुख्य दरवाजा दोरखंडाने बांधला होता.
गस्तीवरील पोलिसांनी या घटनेची माहिती आपल्या वरिष्ठांना दिल्यावर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. बसस्थानकावर, रेल्वे स्थानकासह इतर ठिकाणी दरोडेखोरांचा शोध घेतला; मात्र चोरटे मिळू शकले नाहीत. त्यानंतर मंगळवारी सकाळी पोलिसांनी ठसेतज्ज्ञ व श्वानपथकाला पाचारण करून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
स्वतः सोबत जेवणसुद्धा आणले
सराफी दुकान फोडण्यासाठी आलेले दरोडेखोर चोरी करण्यासाठी येताना आपल्यासोबत जेवणसुद्धा आणल्याचे पोलिसांना आढळले. याशिवाय ते धारदार टिकाव, पहार अशी हत्यारेसुद्धा घेऊन आले होते. चोरट्यांनी प्रवीण वेर्णेकर यांच्या दुकानाच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे काळा स्प्रे मारून बंद केले. त्यामुळे या परिसरातील सीसीटीव्हीत चोरटे दिसून शकले नाहीत.
भाडेकरूंची तपासणी करा
दरम्यान, राज्याच्या विविध भागांत सध्या चोरी, दरोड्याच्या घटना घडत आहेत. पोलिसांनी गस्त वाढवावी तसेच जेथे भाडेकरू राहतात, त्यांची सखोल तपासणी करण्यात यावी, तरच चोरी, दरोड्याच्या घटनांना आळा बसू शकेल, असे सराफ व्यावसायिक प्रवीण वेर्णेकर यांच्यासह व्यापाऱ्यांनी केली.
...या पोलिसांची तत्परता
रात्री ड्युटीवर असलेल्या सतर्क पोलिस कॉन्स्टेबल यशवंत देसाई आणि जगदीश गावकर यांच्यामुळे हा दरोड्याचा प्रयत्न उधळला गेला. त्यामुळे लोकांमधून त्यांचे कौतुक केले जात आहे.
शेतातून काढला पळ
गस्तीवरील पोलिसांनी दरोडेखोरांबाबत माहिती दिल्यानंतर निरीक्षक राऊत देसाई, दोन पीएसआय आणि कॉन्स्टेबल घटनास्थळी आले. त्यांनी दरोडेखोरांचा पाठलाग सुरू केला. मात्र, या टोळक्याने जुन्या पोस्ट ऑफिसच्या मागील बाजूस असलेल्या शेतांतून पळ काढला. हे संशयित स्थानिक असू शकतात असा पोलिसांचा अंदाज आहे.
मास्क घालून आले...
दरोडेखोर तोंडावर मास्क घालून आले होते. त्यांनी आधी मुख्य गेट तोडले, समोरचा दरवाजा बंद केला. नंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर स्प्रे लावला, अशी माहिती पोलिस निरीक्षक हरीश राऊत-देसाई यांनी माहिती दिली.
गस्तीवरचे पोलिस सतर्क
चावडी येथे रात्री गस्तीवर असलेल्या पोलिस कॉन्स्टेबल यशवंत देसाई आणि जगदीश गावकर यांना काहीतरी वेगळा आवाज आल्याने ते दोन वेळा वेर्णेकर यांच्या दुकानाजवळ आले. परंतु, त्यांना कोणीच दिसले नाही. तिसऱ्यांदा लोखंडी पत्रा वाजल्यासारखा आवाज आल्यावर ते पुन्हा दुकानाकडे आले असता ७ ते ८ जणांचे टोळके दिसले. त्यांना पकडण्यासाठी त्यांनी पाठलाग सुरू केला; मात्र पोलिसांवरच दगडफेक करत दरोडेखोर पळून गेले. पोलिसांनी त्यानंतर घराच्या मुख्य दरवाजाला चोरट्यांनी बांधलेले दोरखंड सोडून प्रवीण वेर्णेकर व इतरांना घरातून बाहेर येण्यास मदत केली. सतर्क पोलिसांमुळे दरोडेखोरांचा डाव उधळला.