आरोपांचा राम'बाण'; काणकोणकरांनी राजकारण्यांना धरले जबाबदार, मुख्यमंत्र्यांनी फेटाळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 09:23 IST2025-10-12T09:22:26+5:302025-10-12T09:23:14+5:30
रामाच्या मागे कोण आहे ते कळत नाही; सखोल चौकशी होईल : मुख्यमंत्री

आरोपांचा राम'बाण'; काणकोणकरांनी राजकारण्यांना धरले जबाबदार, मुख्यमंत्र्यांनी फेटाळले
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांना २४ दिवसांनंतर बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळातून काल, शनिवारी डिस्चार्ज मिळाला. डिस्चार्ज मिळताच रामाने आपल्या तीव्र भावना व वेदना माध्यमांसमोर व्यक्त केल्या. आपला पोलिसांवर विश्वासच नाही, असे रामाने जाहीर केले. त्याचवेळी काही राजकारण्यांची रामाने नावे घेत खळबळ उडवून दिली आहे. विरोधकांनी याच मुद्द्यावरून मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
गोमेकॉतून बाहेर पडल्यानंतर माध्यमांशी बोलताना रामा यांनी आपल्यावर झालेल्या हल्ल्यात दोन बड्या मंत्र्यांचा हात असल्याचा दावा करत तशी जबानी आपण न्यायधीशांसमोर देण्यास तयार असल्याचेही सांगितले. रामा यांच्यावर सप्टेंबरच्या मध्यास प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्यात रामा यांना गंभीर दुखापत झाली होती. हल्ल्यानंतर गोमेकॉत उपचार घेणाऱ्या रामा यांना शनिवारी डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली असली, तरी व्हिलचेअरचाच आधार घ्यावा लागत आहे.
रामा यांनी सांगितले की, २ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी माझी सहा पानी जबानी नोंद केली. तीन तास जबानी नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. हा हल्ला वैयक्तिक नाही. माझे कोणाशीही वैर नाही. गुलाबी रंगाचा शर्ट घातलेल्या व्यक्तीने आपल्या आमदाराचे नाव बदनाम का करतोयस?, असे म्हणत मारहाण केली. तू स्वतःला गोव्याचा राखणदार समजतो का?, असेही ती व्यक्ती मारहाण करत असताना मला म्हणत होती. माझ्या चेहऱ्याला शेण लावल्याचेही आपण पोलिसांना सांगितले आहे. पोलिसांनी मात्र आपल्याला अजूनही जबानीची प्रत दिली नसल्याचेही रामा यांनी सांगितले.
ज्या मंत्र्यांच्या अंतर्गत गृहखाते आहे, त्या खात्याकडून अर्थात गोवा पोलिसांकडून या हल्ल्याचा तपास योग्य पद्धतीने होईल, अशी अपेक्षा नाही. आपला गोवा पोलिसांवर जराही विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे सीबीआय किंवा न्यायालयाच्या देखरेखेखाली माझ्यावरील हल्ल्याचा तपास व्हावा, असेही काणकोणकर यांनी सांगितले.
माझी जबानी व्हायरल कशी?
जबानी ही पूर्णपणे गुप्त असते. मग पोलिसांना आपण दिलेली जबानी व्हायरल कशी झाली? तसेच, ज्या संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे, त्यांची जबानी व्हायरल का केली नाही, असा प्रश्न रामा यांनी उपस्थित केला. माझे कोणाशीही वैर नाही. गुलाबी रंगाचा शर्ट घातलेल्या व्यक्तीने आपल्या आमदाराचे नाव बदनाम का करतोयस?, असे म्हणत मारहाण केली. तू स्वतःला गोव्याचा राखणदार समजतो का?, असेही ती व्यक्ती मारहाण करत असताना मला म्हणत होती.
रामाकडून राजकीय वक्तव्ये : मुख्यमंत्री
रामा काणकोणकर यांच्याकडून सध्या राजकीय वक्तव्ये करणे सुरू आहे. त्यांच्यावरील हल्ला प्रकरणाची दखल घेऊन मी स्वतः तपासाचे आदेश दिले. त्यांनी ज्यांची ज्यांची नावे संशयित म्हणून घेतली आहेत त्या सर्वांना अटक केली आहे. त्यांची नोंद केलेली जबानीही आहे आणि आता ते राजकारण्यांची नावे का घेत आहेत ते मला ठावूक नाही. मागील २५ वर्षापासून मी राजकारणात आहे. उगाच क्षुल्लक गोष्टी करण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.
पोलिसांवर विश्वास नाही
जबानी नोंद करताना पोलिसांनी एकदाही कुणावर संशय आहे का? असा प्रश्न केला नाही. हल्ल्यात वापरलेल्या वस्तू जप्त केलेल्या नाहीत, असा आरोप करत रामा यांनी या प्रकरणात मुख्यमंत्री व पर्यटनमंत्र्यांचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
रामाचे आरोप गंभीर, न्यायालयीन चौकशी कराच : विजय सरदेसाई
रामा काणकोणकर यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यांनंतर आमदार विजय सरदेसाई यांनी हल्ल्याप्रकरणी निःष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे. रामा याने पोलिसांना जबानी देताना संबंधित मंत्र्यांची नावे घेऊनही पोलिसांनी कोणतीही अॅक्शन घेतलेली नाही. त्यामुळे हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधींशाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून चौकशीसाठी द्यावे, असेही सरदेसाई म्हणाले.
पंतप्रधानांनी या प्रकरणाची दखल घ्यावी : गिरीश चोडणकर
रामा काणकोणकर यांनी हल्ला प्रकरणात ज्या बड्या मंत्र्यांची नावे घेतली आहेत, त्यांच्यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच कारवाई, अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे. काणकोणकर यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. त्यांनी या मंत्र्यांच्या नावाचा थेट उल्लेख केला आहे. त्यामुळे त्यांच्या आरोपाकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही