New Margao Municipal Chairperson Will Elected Tomorrow | उत्कंठावर्धक मडगाव नगराध्यक्षपदाचा उद्या निर्णय

उत्कंठावर्धक मडगाव नगराध्यक्षपदाचा उद्या निर्णय

 

मडगाव: सर्वाचे लक्ष लागून राहिलेल्या मडगावच्या नवीन नगराध्यक्ष कोण होतील याचा फैसला आज 22 नोव्हेंबरला होणार असून गोवा फॉरवर्डच्या पूजा नाईक व काँग्रेसच्या डॉरीस टेक्सेरा यांच्यात होणारी ही लढत अटीतटीची होण्याची शक्यता आहे. भाजपाने अद्याप आपली भूमिका स्पष्ट न केल्याने या निवडणुकीतील उत्कंठा अजुनही ताणून राहिलेली आहे.

काँग्रेसच्या डॉरीस टेक्सेरा यांनी गुरुवारी काँग्रेसप्रणीत सहा नगरसेवकांच्या उपस्थितीत आपले दोन उमेदवारी अर्ज मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांच्याकडे सुपूर्द केले. यापैकी एका अर्जाला अविनाश शिरोडकर यांनी तर दुसऱ्या अर्जाला दीपा शिरोडकर यांनी अनुमोदन दिले आहे. हे उमेदवारी अर्ज भरताना या तिन्ही नगरसेवकांशिवाय मनोज मसुरकर, शरद प्रभूदेसाई व दामू नाईक हे अन्य नगरसेवक उपस्थित होते.

विजयासाठी आवश्यक असलेले नगरसेवक आपल्याबरोबर रहातील असा विश्र्वास यावेळी टेक्सेरा यांनी व्यक्त केला. मडगाव पालिकेत एकूण 25 नगरसेवक असून  त्यापैकी 12 नगरसेवकांचा पूजा नाईक यांना पाठिंबा आहे. काँग्रेसचे सहा नगरसेवक टेक्सेरा यांच्यामागे  उभे रहातील. भाजपाच्या राहिलेले पांच नगरसेवक कुठल्या बाजूने मतदान करतील त्यावर निकाल अवलंबून रहाणार आहे. भाजपाचे नगरसेवर रुपेश महात्मे यांना यासंदर्भात विचारले असता, आमची रणनिती आम्ही मतदानाच्यावेळीच उघड करु असे ते म्हणाले.
आज 11 वाजता नवीन नगराध्यक्ष निवडून काढण्यासाठी बैठक होणार असून पणजी महापालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीत रॉड्रीगीस हे यावेळी निर्वाचन अधिकारी म्हणून उपस्थित रहाणार आहेत.

Web Title: New Margao Municipal Chairperson Will Elected Tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.