मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड दिलेय, आता वरिष्ठच निर्णय घेतील: दामू नाईक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 11:56 IST2025-03-16T11:55:04+5:302025-03-16T11:56:16+5:30
मंत्रिमंडळ फेरबदलासंदर्भातील घोषणा बी. एल. संतोष करतील

मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड दिलेय, आता वरिष्ठच निर्णय घेतील: दामू नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मंत्रिमंडळातील बदलाची चर्चा रंगलेली असताना, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी काल 'लोकमत'शी बोलताना पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड पक्षाचे प्रभारी बी. एल. संतोष यांना देण्यात आले आहे. तसेच, आपल्या दोन महिन्यांच्या काळातील कामकाजाचा अहवालही देण्यात आला आहे. आता मंत्रिमंडळ फेरबदलाबाबतचा निर्णय प्रभारीच घेणार आहेत, असे दामू नाईक यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांसंबधी तर पक्ष संघटनेशी संबंधित माहिती देण्याचे काम मी केले आहे. त्यामुळे जो काही निर्णय घ्यायचा आहे तो बी. एल. संतोष हेच घेतील. प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर दोन महिन्यांचे पक्षाचे प्रगतीपत्रक बनवून ते हायकमांडला सादरही करण्यात आले असल्याचे दामू नाईक यांनी सांगितले.
सभापती तवडकर यांनी शुक्रवारी मंत्रिमंडळ बदलासंदर्भात विधान करून काही आमदारांची नावे घेतल्याने राजकीय गोटात खळबळ माजली होती. मात्र, काल शनिवारी त्यांनी या विषयावर बोलताना सावध पवित्रा घेतला.
प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांना सभापतींच्या मंत्रिमंडळ बदलासंबंधीच्या वक्तव्याविषयी विचारले असता, त्यांनी यावर वक्तव्य करणे टाळले. तवडकर हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत इतकेच ते म्हणाले.
'ठाम'पणे सांगितलेय
हायकमांडला काय सांगितले याविषयी माहिती पक्षाध्यक्ष दामू नाईक यांनी उघड केलेली नाही. परंतु, जे काही सांगितले ते अगदी ठामपणे सांगितले, असे त्यांनी एक नव्हे, तर तब्बल तीन वेळा 'ठाम' शब्दावर भर देऊन सांगितले. त्यामुळे बरेच काही सांगितले असल्याचे आणि बरेच काही होऊ घातले
असल्याची चर्चाही आहे.
अहंकारी मंत्र्यांविरुद्ध तक्रार
राज्य सरकारमध्ये काही मंत्री अहंकारी असल्याचे वक्तव्य कुणाचेही नाव न घेता सभापती तवडकर यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. याविषयी तवडकर यांना शनिवारी पुन्हा विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी सांगितले की, अहंकारी मंत्र्यांविरुद्धची तक्रार मी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. आता पुढील कारवाई ते करतील, असेही तवडकर यांनी सांगितले.