'मराठीवर अन्याय करणार नाही!', गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 06:28 IST2026-02-22T06:26:56+5:302026-02-22T06:28:45+5:30
गोवा 'लोकमत'च्या 'गोवन ऑफ द इयर' पुरस्कारांचे वितरण; माजी केंद्रीय परराष्ट्र व्यवहारमंत्री एदआर्द फालेरींना 'जीवन गौरव'

'मराठीवर अन्याय करणार नाही!', गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही
पणजी : 'सरकार मराठीवर अन्याय करणार नाही. कोंकणीबरोबरच मराठीलाही गोव्यात समान दर्जा आहे, असे स्पष्ट करताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यात 'लोकमत'ने विश्वासार्हता जपत वाचकांच्या गळ्यातील ताईत बनण्याचा जो मान मिळवला आहे, त्याबद्दल गौरवोद्गार काढले.
पणजी येथील कला अकादमीच्या दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात काल, शनिवारी लोकमत 'गोवन ऑफ द इयर' पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने मुख्यमंत्री बोलत होते.
उत्साह आणि चैतन्याने भारलेल्या वातावरणात तब्बल दीड तास डोळ्यांचे पारणे फेडणारा हा कार्यक्रम झाला. यावेळी माजी केंद्रीय परराष्ट्र व्यवहारमंत्री एदुआर्द फालेरो यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मुख्यमंत्री म्हणाले की, 'लोकमत'ने गोव्यातही लोकांची विश्वासार्हता संपादन केली आहे. दिवंगत जवाहरलाल दर्डा यांनी वृत्तपत्राची स्थापना केल्यानंतर तिसरी पिढी आता वृत्तपत्र व्यवसाय चालवत आहे. 'लोकमत' जनतेची नाडी ओळखून त्यासाठी काम करणारे दैनिक आहे. व्यवसाय म्हणून नव्हे, तर लोकसेवा म्हणून जनजागृतीचे काम लोकमत करत आहे. प्रिंट, डिजिटल अशा सर्वच माध्यमांमध्ये लोकमत वृत्तसमूह जबाबदारीने काम करत आहे.
गोव्यातही गेल्या १७ वर्षाच्या काळात 'लोकमत'ने नेहमीच चांगले काम केले. सरकार राबवत असलेल्या योजना लोकांपर्यंत पोचवल्या. सरकारचे काही चुकत असेल तर मार्ग दाखवण्याचे काम वर्तमानपत्रांनी करावे. टीकात्मक लिहिले म्हणून मी कधी प्रसार माध्यमांना काही विचारले नाही. त्याचप्रमाणे आम्ही राज्य चालवत नाही तर लोकांची सेवा करतो. राज्याच्या विकासासाठी प्रसार माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे.
व्यासपीठावर सभापती गणेश गावकर, लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, राज्यसभा खासदार सदानंद तानावडे, सभापती डॉ. गणेश गावकर, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, बांधकाममंत्री दिगंबर कामत उपस्थित होते.
बातमीच्या वेगाची लय गाठताना 'लोकमत'ने कायमच विश्वासार्हताही जपली : डॉ. विजय दर्डा
लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा म्हणाले की, 'वाचकांचा विश्वास आम्हाला एका रात्रीत मिळालेला नाही, तर त्यामागे प्रदीर्घ काळाचे कष्ट आहेत. 'लोकमत'मध्ये छापून आलेली बातमी सत्यच असणार, असा ठाम विश्वास आमच्या टीमने सततच्या परिश्रमातून कमावला आहे.'
'माझ्या वार्ताहर मित्रांनी दिवसरात्रीची पर्वा न करता बातमीसाठी रस्ते तुडवले आहेत, संपादकांनी डोळ्यात तेल घालून सगळे तपशील तपासले आहेत. बातमीच्या वेगाची लय गाठताना विश्वासार्हताही जपली. गोव्याचे वाचक सजग व चोखंदळ आहेत. सतरा वर्षांपूर्वी लोकमत गोव्यात आला तेव्हा येथील लोकांनी आम्हाला खरं काय ते लिहा. आमचे तुमच्यावर लक्ष आहे', असे सांगितले.
'गोमंतकीय शब्दाचे पक्के आहेत. आज बातम्या तुफान वेगाने प्रवास करत आहेत. काही घडले की, लगेच मोबाइलवर ब्रेकिंग बातम्या धडकतात. या वेगाशी जुळवून घेताना 'लोकमत'ने विश्वासार्हता जपली आहे. गोव्याच्या प्रगतीमध्ये 'लोकमत'चे सदैव योगदान राहील. गोवेकरांनी आजवर भरभरून प्रेम दिले, तसेच यापुढेही द्यावे.'