If found guilty in the investigation action will be taken against Dhananjay Munde sharad Pawar's explanation | चौकशीत दोषी आढळले, तर धनंजय मुंडेंवर कारवाई; पवारांचं स्पष्टीकरण

चौकशीत दोषी आढळले, तर धनंजय मुंडेंवर कारवाई; पवारांचं स्पष्टीकरण

पणजी : महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर असलेल्या बलात्काराच्या आरोपांवर आपला मुळीच विश्वास नाही. याप्रकरणी वाटल्यास चौकशी होऊ द्या. सत्य बाहेर येऊ द्या. मुंडे दोषी आढळले तर कारवाई करण्याची जबाबदारी आमची आहे, असे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी येथे स्पष्ट केले. 
संसदेच्या संरक्षण समितीचे सदस्य म्हणून पवार सध्या गोवा दौऱ्यावर असून, बुधवारी त्यांनी येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांना धनंजय मुंडे यांच्यावर असलेल्या बलात्काराच्या आरोपांबद्दल विचारले. 

पवार म्हणाले की, ‘काही जणांचा बिनबुडाचे आणि निराधार आरोप करण्याचा व्यवसाय बनलेला आहे. या प्रकरणाची वाटल्यास चौकशी होऊ द्या. सत्य काय ते बाहेर येऊ द्या. मुंडे हे दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करण्यास आम्ही जबाबदार आहोत.’ 

केंद्र सरकारने जी शेतकरीविरोधी विधेयके संमत केलेली आहेत, त्याचाही पवार यांनी पुन्हा एकदा समाचार घेतला. पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा, आमदार चर्चिल आलेमांव व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

समितीकडून आढावा -
गोवा शिपयार्ड, कारवार येथील नौदलाचा सी बर्ड तळ तसेच तटरक्षक दलाच्या आस्थापनांना भेट देऊन संसदीय समितीने तेथील सज्जतेचा आढावा घेतला. पवार यांनी राष्ट्रवादीच्या येथील कार्यालयाला दिलेली ही धावती भेट होती.
 

Web Title: If found guilty in the investigation action will be taken against Dhananjay Munde sharad Pawar's explanation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.