Holi 2024: दुष्ट प्रवृत्तीचा नाश करणाऱ्या होळी सणामागील शास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2024 08:11 AM2024-03-23T08:11:37+5:302024-03-23T08:13:36+5:30

Holi 2024: वृक्षरूपी समिधा अग्नीत अर्पण करून त्याद्वारे वातावरणाची शुद्धी करणे, हा उदात्त भाव होळी साजरी करण्यामागे आहे. होळी सणाचे महत्त्व, हा सण साजरा करण्याची पद्धत याविषयीची शास्त्रीय माहिती या लेखातून देण्याचा हा प्रयत्न.

holi 2024 science behind the festival of holi which destroys evil tendencies | Holi 2024: दुष्ट प्रवृत्तीचा नाश करणाऱ्या होळी सणामागील शास्त्र

Holi 2024: दुष्ट प्रवृत्तीचा नाश करणाऱ्या होळी सणामागील शास्त्र

संकलक : तुळशीदास गांजेकर, साखळी

फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी सण उत्साहात साजरा केला जातो. दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत्प्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव म्हणजे होळी. वृक्षरूपी समिधा अग्नीत अर्पण करून त्याद्वारे वातावरणाची शुद्धी करणे, हा उदात्त भाव होळी साजरी करण्यामागे आहे. होळी सणाचे महत्त्व, हा सण साजरा करण्याची पद्धत याविषयीची शास्त्रीय माहिती या लेखातून देण्याचा हा प्रयत्न. (Holi 2024)

होळी सणाचा इतिहास : पूर्वी ढुंढा किंवा ढौंढा नामक राक्षसी गावात शिरून लहान मुलांना पीडा द्यायची. ती रोग निर्माण करायची. तिला गावाबाहेर हाकलून देण्याकरिता लोकांनी पुष्कळ प्रयत्न केले; पण ती जाईना. शेवटी लोकांनी बीभत्स शिव्या-शाप देऊन आणि सर्वत्र अग्नी पेटवून तिला भिववले अन् पळवून लावले. त्यामुळे ती गावाबाहेर पळून गेली.' असे भविष्योत्तरपुराणात म्हटले आहे. 

एकदा भगवान शंकर तपाचरणात गढले होते. ते समाधी अवस्थेत असतांना मदनाने त्यांच्या अंतःकरणात प्रवेश केला. तेव्हा 'मला कोण चंचल करत आहे', असे म्हणून शंकराने डोळे उघडले आणि मदनाला पहाताक्षणीच जाळून टाकले. दक्षिणेतील लोक कामदेव दहनाप्रीत्यर्थ हा उत्सव साजरा करतात. या दिवशी मदनाची प्रतिकृती करून तिचे दहन करतात. या मदनाला जिंकण्याची क्षमता होळीत आहे, म्हणून होळीचा उत्सव आहे.

फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी झालेल्या पृथ्वीवरील प्रथम महायज्ञाची स्मृती म्हणून प्रत्येक वर्षी फाल्गुन र्णिमेच्या दिवशी सर्व भारतात 'होली' या नावाने यज्ञ होऊ लागले. होळीची रचना करण्याची तिला सजवण्याची पद्धतीही स्थानपरत्वे पालटत असल्याचे सध्या पाहायला मिळते. 

सर्वसाधारणपणे 'देवळासमोर किंवा सोयीच्या ठिकाणी पौर्णिमेच्या सायंकाळी होळी पेटवायची असते. बहुधा ग्रामदेवतेसमोर होळी उभी केली जाते. श्री होलिकापूजनाचे स्थान शेणाने सारवून अन् रांगोळी घालून सुशोभित करतात. मधोमध एरंड, माड, पोफळी अथवा ऊस उभा करतात. त्याच्याभोवती गोवऱ्या आणि सुकी लाकडे रचतात. घरातील कर्त्यापुरुषाने शुचिर्भूत होऊन आणि देशकालाचा उच्चार करून 'सकुटुंबस्य मम ढुण्ढाराक्षसीप्रीत्यर्थं तत्पीडापरिहारार्थ होलिकापूजनमहं करिष्ये।' असा संकल्प करावा आणि नंतर पूजा करून नैवेद्य दाखवावा. त्यानंतर 'होलिकायै नमः।' असे म्हणून होळी पेटवावी. होळी पेटल्यावर होळीला प्रदक्षिणा घालावी आणि पालथ्या हाताने बोंबमारावी. 

होळी पूर्ण जळल्यानंतर ती दूध अन् तूप शिंपडून शांत करावी. श्री होलिकादेवतेला पुरणपोळीचा नैवेद्य तसेच नारळ अर्पण करावा. मग जमलेल्या लोकांना त्याचा प्रसाद द्यावा. नारळ, पपनस यांसारखी फळे वाटावीत. सारी रात्र नृत्यगायनात व्यतीत करावी.

होळीच्या दिवशीची 'होलिका' ही 'होलिका' राक्षसीण नव्हे !

भक्त प्रल्हादाला घेऊन आगीत बसलेली 'होलिका' ही राक्षसीण होती. होळीच्या दिवशी म्हटल्या जाणाऱ्या मंत्रांमध्ये जो 'होलिका' असा उल्लेख येतो, तो फाल्गुन पौर्णिमेला उद्देशून आहे; त्या राक्षसीणीला उद्देशून नव्हे. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी लाकडे रचून होम करतात, म्हणून त्या तिथीला होलिका म्हणतात. थंडीच्या दिवसांत शरीरात साठलेला कफ दोष होळीच्या काळात सूर्याच्या उष्णतेमुळे पातळ होतो आणि त्याच्यामुळे विकार उत्पन्न होतात. होळीच्या औषधी धुरामुळे कफ न्यून होण्यास साहाय्य होते. सूर्याच्या उष्णतेमुळे पित्त काही प्रमाणात वाढते गाणे, हसणे आदींनी मन प्रसन्न होते आणि पित्त शांत होते. होळीच्या वेळी म्हटलेल्या रक्षोघ्न मंत्रांनी वाईट शक्तींचा त्रासही न्यून होतो, असे वैद्य मेघराज माधव पराडकर, गोवा यांनी म्हटले आहे. 

होळीतील 'बोंब मारणे' या कृतीमागील शास्त्र:

होळी पेटवल्यानंतर बोंब मारण्याची प्रथा सर्वत्र पहायला मिळते. ही विकृती नसून त्यामागेही शास्त्र दडलेले आहे; मात्र काही ठिकाणी याचा अतिरेक केला जाऊन परस्परांतील वैर चव्हाट्यावर आणण्यासाठीही बोंब मारली जाते. 'होळीच्या दिवशी अश्लील शब्द उच्चारणे, शिवीगाळ करणे आदी कृती परंपरा म्हणून केल्या जातात. याला धर्मशास्त्रात आधार नाही. मुळात संस्कृत भाषेत एकही शिवी नाही. असे असताना 'शिवीगाळ करणे' हा हिंदूच्या सणाचा भाग कसा होऊ शकेल? होळीच्या दिवशी बोंब मारताना शिवीगाळ करणे धर्मशास्त्राच्या दृष्टीने चुकीचे आहे. दुष्ट प्रवृत्ती शांत होण्याकरिता हा विधी आहे. फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला पूर्वा फाल्गुनी नक्षत्र येते. त्या नक्षत्राची देवता 'भग' ही आहे. तेव्हा भगाच्या नावाने बोंब ठोकायची, ही एक प्रकारची पूजाच होय. तो त्या देवतेचा सन्मानच समजावा.

सांप्रत होळीच्या निमित्ताने गैरप्रकार होतात, उदा. वाटमारी होते, दुसऱ्याची झाडे तोडली जातात, मालमत्तेची चोरी होते, दारू पिऊन धिंगाणा घातला जातो. तसेच रंगपंचमीच्या निमित्ताने एकमेकांना घाणेरड्या पाण्याचे फुगे फेकून मारणे, घातक रंग अंगाला फासणे आदी गैरप्रकार होतात. या गैरप्रकारांमुळे धर्महानी होते. ही धर्महानी रोखणे हे आपले धर्मकर्तव्यच आहे. यासाठी समाजाचेही प्रबोधन करा, प्रबोधन करूनही गैरप्रकार घडताना आढळल्यास पोलिसांत गान्हाणे करा. सनातन संस्था समविचारी संघटना आणि धर्मप्रेमी यांच्यासह यासंदर्भात अनेक वर्षांपासून जनजागृती चळवळ राबवत आहे. आपणही यात सहभागी होऊ शकता.

संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ 'सण, धार्मिक उत्सव आणि व्रते.

Web Title: holi 2024 science behind the festival of holi which destroys evil tendencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.