राजकीय दबावाखाली गोल्फ कोर्सला मान्यता!

By Admin | Updated: June 8, 2014 01:24 IST2014-06-08T01:22:26+5:302014-06-08T01:24:35+5:30

पणजी : तेरेखोल येथे शेतकऱ्यांच्या लाखभर चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेत गोल्फ कोर्स प्रकल्प उभा करण्यासाठी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने

Golf course recognition under political pressure! | राजकीय दबावाखाली गोल्फ कोर्सला मान्यता!

राजकीय दबावाखाली गोल्फ कोर्सला मान्यता!

पणजी : तेरेखोल येथे शेतकऱ्यांच्या लाखभर चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेत गोल्फ कोर्स प्रकल्प उभा करण्यासाठी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने राजकीय दबावाखाली दिल्ली येथील कंपनीला मान्यता दिली आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत केला.
फर्नांडिस म्हणाले की, काँग्रेस सरकारच्याही काळात आम्ही एकाही गोल्फ कोर्सला गोव्यात मान्यता दिली नाही; कारण गोल्फ कोर्ससाठी प्रचंड प्रमाणात पाण्याची गरज असते. भू-जल पातळी त्यामुळे खालावते. आता तेरेखोल येथे शेतकऱ्यांच्या जमिनीत गोल्फ कोर्स उभा केला जाणार आहे. त्या प्रकल्पाला पाणी कुठून आणले जाणार ते सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी फर्नांडिस यांनी केली. गोल्फ कोर्सला आमचा विरोध नाही; पण पाण्यासारख्या सुविधा गोल्फ कोर्सला पुरविताना सरकारने गरीब शेतकऱ्यांच्या हिताआड येऊ नये, असे फर्नांडिस म्हणाले.
राज्यातील किनाऱ्यांवर सध्या तेलगोळे वाहून आले आहेत. उत्तर व दक्षिण गोव्यातील किनारपट्टी तेलगोळ्यांपासून स्वच्छ करण्याची जबाबदारी तटरक्षक दलाची आहे; पण तटरक्षक दल आपली जबाबदारी पार पाडण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे, अशी टीका फर्नांडिस यांनी केली. मी येत्या आठवड्यात तटरक्षक दलाविरुद्ध संरक्षणमंत्री अरुण जेटली यांच्याकडे तक्रार करणार आहे; कारण तेलगोळ्यांमुळे गोव्यातील सागरी पाणी प्रदूषित झाले आहे. मत्स्यसंपत्ती धोक्यात आली असून लोकांच्या आरोग्यावर याचा मोठा परिणाम होणार आहे. तेलगोळ्यांपासून किनारपट्टीचे रक्षण करणे हे तटरक्षक दलाचे काम आहे. किनारपट्टीत सोन्याची तस्करी रोखणे हेही तटरक्षक दलाचेच काम आहे. राज्य सरकारने तेलगोळ्यांच्या समस्येबाबत काहीच भाष्य केलेले नाही. तटरक्षक दलाने एव्हाना किनारे स्वच्छ करायला हवे होते. तटरक्षक दलाकडे त्यासाठीची सगळी यंत्रणा आहे. मात्र, तिचा वापर केला जात नाही, असे फर्नांडिस म्हणाले. तेलगोळ्यांचे दुष्परिणाम मत्स्यसंपत्तीवर होत असून गोमंतकीयांना आरोग्यावर यापुढे जास्त खर्च करावा लागेल, असे फर्नांडिस यांनी नमूद केले. (खास प्रतिनिधी)

Web Title: Golf course recognition under political pressure!