दरोड्याच्या घटनेमुळे हादरला गोवा; ७ दरोडेखोरांनी पती-पत्नीसह मुलीला बांधून लोखंडी सळीने केली बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 10:59 IST2025-11-19T10:59:15+5:302025-11-19T10:59:45+5:30
बायणा येथील 'चामुंडी आर्केड'च्या सहाव्या मजल्यावर मध्यरात्री थरार : हल्ल्यात पती गंभीर जखमी; रोख रक्कम, दागिन्यांसह लाखोंचा ऐवज लंपास; तर सांताक्रूझमध्ये फ्लॅट फोडून लाखोंचा ऐवज लंपास

दरोड्याच्या घटनेमुळे हादरला गोवा; ७ दरोडेखोरांनी पती-पत्नीसह मुलीला बांधून लोखंडी सळीने केली बेदम मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को : राज्यात गुन्ह्यांची मालिका सुरूच असून काल, मंगळवारी पहाटे २ च्या सुमारास बायणा-वास्को येथील 'चामुंडी आर्केड' इमारतीच्या सहाव्या मजल्यावर सात जणांच्या टोळीने दरोडा घातल्याची घटना घडली. सागर नायक यांच्या मालकीचा हा फ्लॅट असून दरोडेखोरांनी सागर यांच्यासह त्यांची पत्नी व १३ वर्षाच्या मुलीला जबर मारहाण केली. दरोडेखोरांनी रोख रक्कमेसह लाखो रुपयांचा ऐवज लुटला. या घटनेमुळे बायणासह संपूर्ण गोवा हादरला आहे.
सविस्तर वृत्त असे की, ६० वर्षीय सागर नायक हे नुकतेच एमपीएमधून निवृत्त झाले आहेत. बायणा 'चामुंडी आर्केड'मध्ये ते पत्नी हर्षा, मुलगी नक्षत्रा आणि वृद्ध सासूबरोबर राहतात. मंगळवारी पहाटे २ च्या सुमारास सात दरोडेखोरांनी इमारतीच्या मागच्या बाजूला असलेल्या कुंपणावरून आत प्रवेश केला. यावेळी इमारतीच्या लिफ्टचा वापर करून ते सहाव्या मजल्यावर गेले. दरोडेखोरांनी ओळख पटू नये म्हणून हेल्मेट व मास्क घातले होते. सहाव्या मजल्यावर पोचल्यानंतर दरोडेखोर सागर यांच्या फ्लॅटच्या मागच्या बाजूला गेले व स्वयंपाक खोलीला असलेल्या खिडकीची काच तोडून फ्लॅटमध्ये शिरले.
त्यानंतर ज्या खोलीत सागर, पत्नी आणि मुलगी झोपली होती त्या खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला व सागरवर लोखंडी सळीने वार करून त्यांना जखमी केले. तसेच पत्नी आणि मुलीलाही मारहाण केली. त्यानंतर सागर यांच्याकडे कपाटांची चावी मागितली, परंतु त्यांनी नकार दिल्याने दरोडेखोरांनी त्यांच्या डोक्यावर सळीने वार केले. त्यानंतर पत्नीने दरोडेखोरांना चावी दिली. दरोडेखोरांनी सागरसह पत्नी व मुलीला बांधून ठेवले. तसेच दुसऱ्या खोलीत झोपलेल्या सागर यांच्या सासूलाही बांधून ठेवले आणि कपाटातील रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि चांदीच्या वस्तू मिळून घरातील लाखोंचा ऐवज घेऊन पलायन केले.
दरोडेखोरांच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सागर यांना शेजाऱ्यांनी तातडीने चिखली उपजिल्हा इस्पितळात नेले. मात्र, त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले. दरोड्याची माहिती मिळताच दक्षिण गोवापोलिस अधीक्षक टीकम सिंग वर्मा, मुरगावचे पोलिस उपअधीक्षक गुरुदास कदम, पोलिस निरीक्षक शरीफ जॅकीस, वास्कोचे पोलिस निरीक्षक वैभव नाईक यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी घटनास्थळावर श्वान पथक, ठसेतज्ज्ञ, फोरेन्सिक युनिटला पाचारण करून तपासणी केली.
ऐवज लुटल्यानंतर दरोडेखोर पुन्हा लिफ्टचा वापर करून खाली उतरून इमारतीच्या मागच्या बाजूला असलेल्या कुंपणावरून उडी मारून तिथून पळून गेले. त्याचवेळी मुलीने कसेबसे स्वतःला सोडवून त्याच इमारतीत राहणारे सागर यांचे भाऊ प्रसाद यांच्याकडे जाऊन घटनेची माहिती दिली. त्याचवेळी शेजाऱ्यांनी याबाबत पोलिसांत कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
थोडावेळ द्या, संशयितांपर्यंत आम्ही पोहचू ः डीआयजी शर्मा
बायणा येथील दरोड्याच्या घटनेचा तपास गतीने सुरू आहे. संशयितांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती डीआयजी वर्षा शर्मा यांनी दिली. आम्ही या प्रकरणावर काम करत आहोत. थोडा वेळ द्या, संशयित नक्की ओळखले जातील, असेही त्या म्हणाल्या. यापूर्वीच्या दोन दरोड्याच्या घटनांमधील आरोपींची ओळख पटवण्यात यशस्वी झालो आहोत. या प्रकरणातही आम्ही तीच काटेकोर तपासपद्धती अवलंबत आहोत. हा तपास आम्ही एक प्रकारे आव्हान म्हणून स्वीकारले आहे, असेही डीआयजी वर्षा शर्मा म्हणाल्या. वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी इस्पितळात जाऊन सागर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
ठळक मुद्दे...
पहाटे २ वाजून १० मिनिटांनी सातजणांची टोळी सागर यांच्या फ्लॅटमध्ये शिरली व एक तासात म्हणजे ३.१० मिनिटांनी त्यांनी ऐवज लुटून पलायन केले.
फ्लॅटमधून बाहेर पडताना दरोडेखोरांनी सागर यांच्या पत्नीकडून त्यांच्या चारचाकी वाहनाची चावी घेतली. नंतर ते लिफ्टने खाली गेले. सागर यांच्या वाहनाकडे गेल्यानंतर कारची चावी फ्लॅटमध्ये विसरून आल्याचे दरोडेखोरांच्या लक्षात आले. आल्यानंतर ते सर्वजण फ्लॅटमधून खाली कारपर्यंत गेल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. कारजवळ गेल्यानंतर आपण कारची चावी विसरून आल्याचे दरोडेखोरांच्या लक्षात येताच त्यांनी इमारतीच्या पाठीमागील बाजूला असलेल्या कुंपणावरून उड्या मारून पलायन केले.
पोलिस तपासात इमारतीच्या परिसरात कुंपणाच्च्या दुसऱ्या बाजूने एक लाकडी शिडी कुंपणाला उभी करून ठेवल्याचे दिसून आले. दरोडेखोरांनी कुंपणावर चढण्यासाठी शिडीचा वापर केला असावा असा संशय व्यक्त केला. विशेष म्हणजे दरोड्याची घटना घडलेल्या चामुंडी आर्केड इमारतीत सुरक्षारक्षक नसल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, इमारतीत सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. दरोडेखोरांनी सीसीटीव्ही चुकवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.
हेल्मट घालून आलेले...
पहाटे २.१५ वाजता सात दरोडेखोरांनी फ्लॅटमध्ये घुसून पतीला जबर मारहाण केली. मला आणि मुलीलाही मारहाण करून नंतर सर्वांना बांधून लाखोंचा ऐवज लंपास केल्याची माहिती सागर यांची पत्नी हर्षा नायक यांनी दिली. घरात घुसलेल्या दरोडेखोरांनी हेल्मेट घातल्याने त्यांचा चेहरा दिसला नाही. मात्र ते सर्वजण २३ ते २५ वयोगटातील असावेत, असे त्यांना पाहून समजत होते. तसेच ते हिंदी बोलत होते, असे हर्षा यांनी सांगितले.
४५ लाख रुपयांचा ऐवज
सागर यांच्या फ्लॅटमधून दरोडेखोरांनी नेमका कितीचा ऐवज लंपास केला हे स्पष्ट झालेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार सागर यांच्या फ्लॅटमधून १ लाखांची रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि चांदीच्या वस्तू मिळून जवळपास ४५ लाखांचा ऐवज लुटल्याची माहिती मिळाली आहे.
'आईस्क्रीम'चे बॉक्सही नेले...
सागर यांचा भाऊ प्रसाद नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार, सातजण सागर यांच्या फ्लॅटमध्ये शिरले होते. तर एकजण इमारतीच्या खाली उभा असल्याचे सीसीटीव्हीत दिसते. फ्लॅटमध्ये ते मागच्या बाजूने आले याचा अर्थ त्यांनी आधी पाहणी केली असावी, असा संशयही प्रसाद यांनी व्यक्त केला. सागर यांचे आईस्क्रीम पार्लर आहे. त्यामुळे घरात असलेले आईस्क्रीमचे बॉक्सही दरोडेखोरांनी नेल्याचे प्रसाद यांनी सांगितले.
सीसीटीव्हीची पाहणी
अधिक माहितीसाठी पोलिस उपअधीक्षक गुरुदास कदम यांना संपर्क केला असता सागरच्या घरात दरोडा घातलेल्या अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध मुरगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या ३३१, १०९, ३५१, १२६ आणि ३१० कलमाखाली तसेच गोवा बालहक्क कायद्याच्या ८ कलमाखाली गुन्हा नोंद केल्याचे सांगितले. तसेच दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक टीकम सिंग वर्मा यांनी सीसीटीव्ही फुटेजसह विविध माध्यमातून या घटनेचा तपास सुरू असल्याचे सांगितले.
सांताक्रूझमध्ये २५ लाखांची चोरी
पणजी : बायणा येथील फ्लॅटमध्ये दरोड्याच्या घटनेमुळे सर्वत्र भितीचे वातावरण असतानाच सांताक्रूझ-पणजी येथे फ्लॅटमध्ये चोरीची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी फ्लॅट फोडून २५ लाख रुपये किंमतीचे सोने लुटण्याची घटना उघडकीस आली आहे. सांताक्रूझ येथील उबो दांडो वाड्यावरील टोनी अपार्टमेंटमधील कुसूम चौहान यांच्या फ्लॅटमध्ये चोरीची घटना घडली. यावेळी चोरट्यांनी घरात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले. या प्रकरणात कुसूम यांनी जुने गोवे पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविला आहे. ही घटना १४ नोव्हेंबरच्या रात्री घडली होती. या संदर्भात पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी सांगितले की, चोरट्यांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले असून लवकरच त्यांना जेरबंद करू.
सर्वत्र झाडाझडती...
एका दिवसांत राज्यात बायणा-वास्को व सांताक्रूझ-पणजी येथे घडलेल्या दरोड्याच्या दोन घटनांनी सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही घटनांत मुरगाव व जुने गोवे पोलिस कसून चौकशी करत आहेत. बायणा येथील घटनेनंतर दक्षिण गोव्यात पोलिसांनी झाडाझडती सुरू केली आहे. उत्तर गोव्यातही कसून तपास केला जात असून वाहनांची तपासणी केली जात आहे. बसस्थानके, रेल्वे स्थानक तसेच विमानतळ परिसरात पोलिसांच्या पथकाकडून चौकशी केली जात आहे.