Goa Election 2022: “महाराष्ट्रातील शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे गोव्यात प्रचाराला येणार”: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 14:19 IST2022-01-21T14:18:42+5:302022-01-21T14:19:36+5:30
Goa Election 2022: शिवसेनेचे वाघ गोव्याच्या विधानसभेत जायलाच पाहिजे आणि गोवेकर यंदा शिवसेनेला संधी देईल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Goa Election 2022: “महाराष्ट्रातील शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे गोव्यात प्रचाराला येणार”: संजय राऊत
पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Election 2022) पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या नऊ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले. गोव्यातील निवडणूक प्रचारासाठी शिवसेनेचे प्रमुख नेते आणि युवासेनेचे प्रमुख तसेच मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) येणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.
महाराष्ट्रातून शिवसेनेचे प्रमुख नेते इथे प्रचाराला येतील. कॅबिनेटमंत्री, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे स्वत: प्रचाराला उतरतील. गेल्या काही दिवसांपासून आम्ही पाहतोय, शिवसेनेला अनेक मतदारसंघांमधून चांगला प्रतिसाद मिळतोय. गोव्याच्या राजकारणात शिवसेना नवीन पक्ष नाही. आपण मागील काही वर्षांपासून पाहत आहात, जरी निवडणुकीत आम्हाला यश मिळाले नसले तरी गोव्यात शिवसेना दमदारपणे काम करत आहे. गोव्यातील निवडणुका आम्ही २०१७ साली देखील लढवल्या होत्या, यावेळी गोव्याचे राजकारण आणि गोव्याच्या निवडणुका एकंदरीत वातावरण, हे काय फार आशादायी दिसत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
आलेमाव गेलेमाव संस्कृती मोडून काढायचीय
राष्ट्रवादी काँग्रेससोबत झालेल्या पत्रकारपरिषदेत मी सांगितलं, की हिंदी भाषिक पट्ट्यात आयाराम-गयाराम हा शब्द प्रचलीत आहे. पण गोव्याच्या बातीत म्हणायचं तर आलेमाव गेलेमाव हा एक नवीन राजकारणातील वाकप्रचार दिसत आहे. कोण कधी आले आणि कोण कधी गेले, कधी कोण बंड करेन याचा आता भरवसा नाही. त्याही परिस्थितीत शिवसेना ही निवडणूक लढते आहे. गोव्यातील प्रस्थापितांना जर घरी बसावयचे असेल, ही आलेमाव गेलेमाव संस्कृती जर मोडून काढायची असेल, तर जनतेतील सामान्यातील सामान्य उमेदवारांना उमेदवारी गोव्यात द्यायची. बाळासाहेब ठाकरे यांनी सतत सामान्य माणसाला राजकारणात आणून ताकद दिलेली आहे. अशा पद्धतीचा एक नवीन प्रवाह गोव्यात सुरू करावा. म्हणून त्या त्या मतदारसंघातील सामान्य चेहरे हे निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचे आम्ही ठरवलेले आहे, असे संजय राऊत म्हणाले.
शिवसेनेचे वाघ गोव्याच्या विधानसभेत जायलाच पाहिजे
शिवसेना साधारण १० ते १२ जागा लढेल. आज नऊ उमेदवारांची घोषणा आम्ही करत आहोत. उरलेल्या तीन मतदारसंघाची उद्या आम्ही घोषणा करू. आम्ही ठरवलय की या वेळी प्रत्येक मतदारसंघात अत्यंत गांभीर्याने आणि ताकदीने निवडणुका लढवेल. गोव्याच्या जनतेचा आवाज, स्थानिकांचे प्रश्न, पर्यावरणाचे प्रश्न, भ्रष्टाचार, स्थानिक राजकारण्यांची दंडेलशाही, हे सगळं जर थोपवायचं असेल तर शिवसेनेचे वाघ गोव्याच्या विधानसभेत जायलाच पाहिजे आणि गोव्याची जनता यंदा शिवसेनेला संधी देईल अशी मला खात्री आहे, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.