भाजपा आमदार पुत्राच्या कारच्या धडकेत तरुणीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 22:51 IST2018-10-08T22:47:30+5:302018-10-08T22:51:18+5:30
चिडलेल्या जमावाने बीएमडब्ल्यू कार पेटवली

भाजपा आमदार पुत्राच्या कारच्या धडकेत तरुणीचा मृत्यू
बेळगाव : आझादनगरहून अमननगरकडे हायवे ओलांडून जाणाऱ्या तरुणीला सुसाट वेगाने येणाऱ्या बीएमडब्ल्यू कारने जोरात धडक दिल्याची घटना बेळगावात घडली. यामध्ये तरुणीचा मृत्यू झाला आहे. पुणे-बंगळुरू हायवेवर सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाला. या कारची नोंद गोव्यातील हळदोणा मतदारसंघाचे भाजप आमदार ग्लेन टिकलो यांच्या नावावर आहे. अपघातावेळी त्यांचा मुलगा गाडी चालवत होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रथम कारची नासधूस केली व नंतर ती पेटवून दिली. यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करतआग विझवूली आणि चालकाला ताब्यात घेतले.
तहनियत वाहिद बिशती (१८) रा.आजाद नगर, मेन रोड-बेळगाव असे मृत तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तहनियत ही राष्ट्रीय महामार्गावरून आझादनगरकडून आपल्या लहान बहिणीसोबत अमननगरकडे जात होती. त्यावेळी भरधाव जात असलेल्या बीएमडब्ल्यू कारने (क्र. जीए 0३ झेड 0६७८) तिला धडक दिली. या अपघातात ती गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी लेक व्ह्यू इस्पितळात दाखल केले. मात्र तिचा मृत्यू झाला. या अपघातात तहनियतची लहान बहिण किरकोळ जखमी झाली आहे.