अग्निशामकच्या जवानांनी वर्षभरात वाचविली ६३ कोटींची संपत्ती; १६५ नागरिकांचे प्राण वाचविण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 07:41 IST2026-04-14T07:41:38+5:302026-04-14T07:41:38+5:30
राष्ट्रीय अग्निशामक सेवा सप्ताह आजपासून

अग्निशामकच्या जवानांनी वर्षभरात वाचविली ६३ कोटींची संपत्ती; १६५ नागरिकांचे प्राण वाचविण्यात यश
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्यातील अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाने २०२५-२६ या आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल ६३ कोटी ५२ लाख ४१ हजार ९८२ रुपयांची संपत्ती वाचविण्यात यश मिळविले आहे. विविध आग व आपत्कालीन घटनांमुळे १८ कोटी १६ लाख ५७ हजार १२६ रुपयांचे नुकसान झाले असले, तरीही तत्पर सेवेमुळे मोठे नुकसान टळले आहे.
राष्ट्रीय अग्निशामक सेवा सप्ताहानिमित्त राज्यात आज, १४ एप्रिलपासून विविध जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रमांना सुरुवात होत आहे. या निमित्त नागरिकांमध्ये अग्नी सुरक्षिततेबाबत जागरुकता निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. गेल्या काही वर्षात संचालनालयाने आधुनिक साधनसामग्री, प्रशिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सेवेत सुधारणा केली आहे.
अग्निशमन दलाच्या जवानांनी वर्षभरात अनेक जीव वाचवून आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. आग, पाण्यात बुडणे, विहिरीत पडणे अशा विविध घटनांमध्ये तातडीने घटनास्थळी पोहोचून त्यांनी १६५ नागरिकांचे प्राण वाचविले. याशिवाय ८७४ प्राण्यांचेही प्राण वाचविण्यात आले आहेत.
दरम्यान, गेल्या वर्षभरात एकूण ७हजार ९४५ आपत्कालीन कॉल्स प्राप्त झाले. यापैकी २ हजार ८७५ घटना आगीसंदर्भातील तर ५ हजार ७९ इतर आपत्कालीन स्वरूपाच्या होत्या. घरांवर झाडे कोसळणे, वीज खांब पडणे, वाहनांवर झाडे कोसळणे तसेच पाण्यात पडण्याच्या घटनांमध्येही अग्निशमन दलाने तत्परतेने मदत केली.
जनजागृतीवर भर
राष्ट्रीय अग्नी सेवा सप्ताहानिमित्त नागरिकांना अग्नी सुरक्षा नियमांची माहिती देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणे येथे प्रात्यक्षिके, मार्गदर्शन सत्रे आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातील. घरगुती तसेच व्यावसायिक ठिकाणी आग लागल्यास कसे वागावे, प्राथमिक उपाययोजना कोणत्या कराव्यात, याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
नियम कडक; तपासणीत वाढ
अलीकडील आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अग्नी सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. विशेषतः हॉटेल, क्लब, व्यापारी आस्थापने यांची तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी सुधारणा सुचविण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असून, काही आस्थापनांचे परवानेही रद्द करण्यात आले आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही मोहीम पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार संचालनालयाने व्यक्त केला आहे.
२९ जणांचा मृत्यू
गेल्या वर्षभरात २९ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची नोंद आहे. विशेषतः पणजीतील रोमियो लेन परिसरातील क्लबला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर प्रशासनाने अग्नी सुरक्षा नियम अधिक कडक केले आहेत. विविध आस्थापनांची तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी परवाने रद्द करण्यात आले आहेत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संचालनालयाने कठोर पावले उचलली आहेत.