गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे संरक्षणमंत्री राहिलेल्या मनोहर पर्रीकर यांची आज पुण्यतिथी. मुख्यमंत्री म्हणून गोव्याच्या विकासात आणि संरक्षणमंत्री म्हणून देशाच्या सैन्यदलासाठीचे त्यांचे योगदान कायम संस्मरणीय आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त...
आज बाबा देवाघरी जाऊन तब्बल सहा वर्षे झाली. माझ्यासाठी, माझ्या वडिलांची आठवण ही एका क्षणापुरती नाही, तर त्यांच्या हास्यापासून, त्यांनी शिकवलेल्या धड्यांपासून आणि त्यांच्या उपस्थितीत लपलेल्या अव्यक्त प्रेमापासून विणलेली एक टेपेस्ट्री आहे. त्यांच्या जाण्याने माझ्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली. इतकी खोल की, ती वर्णनाला आव्हान देते आणि तरीही इतकी सूक्ष्म की, ती दैनंदिन जीवनाच्या भेगांमध्ये सहज शिरते.
सुरुवातीला वाटलं होतं की, दिवस आणि वर्षे निघून गेल्यावर ही पोकळी हळूहळू कमी होईल. पण, आता हे अशक्य आहे, याची जाणीव झाली आहे. मी व्यक्त करत असलेल्या या भावना केवळ माझ्यापुरत्या मर्यादित नाहीत; ज्यांनी आपले वडील गमावले आहेत, त्यांनाही असंच वाटत असेल. तरीही, माझ्या वडिलांनी मागे ठेवलेला वारसा या भावनांना अधिक तीव्र करतो. आज गोव्यात दैनंदिन कामासाठी कुठेही गेलं, तरी त्यांनी सोडलेली छाप दिसते आणि ती या भावनांना आगीत तूप घातल्याप्रमाणे उफाळून आणते.
उदाहरणार्थ, मी जेव्हा अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्कोजवळ राहत होतो, तेव्हा बाबा आले की, आम्ही 'गोल्डन गेट ब्रिज' पाहायला तीर्थयात्रेसारखं जायचो. आमच्या घरी त्या पुलासमोर काढलेले अनेक फोटो आहेत. एका जवळच्या व्यक्तीने मला विचारलं होतं, 'अमेरिकेत बघायला दुसरं काही नाही का?' पण आता जेव्हा मी गोव्यात अटल सेतू किंवा नव्या जुवारी पुलावरून माझ्या कारखान्यात जातो, तेव्हा या आठवणींचा ओलावा डोळ्यांत जाणवतो.
गेल्या महिन्यात मी पुण्याला मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गेलो. बाबांच्या सहवासातील अनेकजण तिथे उतरतात आणि पहिला फोन करून विचारतात, 'हे अर्धवट नाव कशासाठी?', मी त्यांना काय सांगणार? हो-नाहीत उत्तर द्यायचं. पण, २००१ साली, जेव्हा मी अमेरिकेत शिकायला गेलो होतो, तेव्हा बाबा मला भेटायला डेट्रॉइटजवळ माझ्या विद्यापीठात आले होते. मी नवीनच असल्याने माझ्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नव्हतं. मग आयएएस विजय मदन यांनी गाडी भाड्याने घेऊन आम्ही मॉन्ट्रियलला गेलो, जिथे आयसीएओ (इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन) आहे. या आठवणी परत येणार नाहीत का? पण या मोठ्या गोष्टींपेक्षा सुखद आठवणी लोकांच्या सहज संपर्कातून येतात. एका हितचिंतकाने माझ्यासाठी देवळात प्रार्थना केली आणि मला म्हणाला, 'आमोण्याला सोबत ये.' एका रविवारी मी त्याच्यासोबत त्या देवळात गेलो.
दर्शनानंतर जवळच्या चहाच्या दुकानात चहा आणि मिरच्या खात बसलो, तेव्हा दुकानाचा मालक मला पाहून बाहेर आला आणि म्हणाला, 'आमोण्याला आल्यावर भाई इथेच बसून चहा घेत,' आणि चक्क पैसे घेण्यास नकार दिला. त्याच्या या प्रेमापुढे मी तरी किती आग्रह धरणार?
काणकोणला एकदा कार्यक्रमानिमित्त गेलो, तेव्हा एका भाजपच्या कार्यकर्त्याकडे चहाला थांबलो. खुर्चीत बसलो, तर तो म्हणाला, 'भाई माझ्या घरी येत असत आणि इथेच बसत,' असं म्हणून त्याने डोळ्यात अश्रू आणले. अशा छोट्या-छोट्या गोष्टी लोकांमध्ये मिसळताना घडतात, तेव्हा ही पोकळी विसरण्यासाठी मनाला जणू लेप लावल्यासारखं वाटतं.
हा लेख मी मुद्दाम वैयक्तिक विषयावर लिहिला आहे. आज गोवा राजकीयदृष्ट्या कुठल्या दिशेने जातोय किंवा बाबा असते तर काय घडलं असतं, हे भाकीत मला करायचं नाही. त्यावर 'judge आणि jury' ही जनताच असलेली बरी. तरीही, सोशल मीडियावर अनेकदा 'आज भाई आसुंक जाय आशिल्लो' असं वाचलं की, लोकांच्या मनात त्यांच्या आठवणी अजूनही ठाम आहेत, याची खात्री पटते.