आदिवासी समाजाचा आवाज दाबू नका: गोविंद गावडे; विरोधकांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 11:48 IST2025-07-10T11:48:22+5:302025-07-10T11:48:38+5:30
बहुजन समाजाचा आवाज दाबण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही गावडे यांनी दिला आहे.

आदिवासी समाजाचा आवाज दाबू नका: गोविंद गावडे; विरोधकांना इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'उटा' ही फक्त संघटना नसून ती एक चळवळ आहे. आदिवासी समाजाचा आवाज दाबण्याचा आणि त्यांना गुलाम करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, असा इशारा माजी मंत्री तथा प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांनी दिला. युनायटेड ट्रायबल असोसिएशन्स अलायन्स (उटा) चे अध्यक्ष म्हणून प्रकाश वेळीप यांना काम करण्यास व आर्थिक व्यवहार हाताळण्यास जिल्हा उपनिबंधकांनी अंतरिम मनाई केल्यानंतर गावडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
बहुजन समाजाचा आवाज दाबण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही गावडे यांनी दिला आहे. गावडे म्हणाले, 'उटा' संघटनेच्या चळवळीमुळेच आदिवासी समाजाला त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवून दिले आहेत. यासाठी अनेकांनी संघर्ष केला आहे. अनेकजण आता त्याचा लाभ घेत आहेत. आदिवासी समाजाचा आवाज दाबण्याचा, त्यांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न होतोय; पण आम्ही गप्प बसणार नाही.
'त्या' अधिकाऱ्याचे कॉल डिटेल्स तपासा
आमदार गावडे म्हणाले की, 'ज्या नोंदणी अधिकाऱ्यांनी संघटनेवर बंदीचे आदेश दिले आहेत, त्यांच्या फोनचे कॉल डिटेल्स तपासणे गरजेचे आहे. त्यांनी कोणाच्या दबावाने हा आदेश तातडीने काढला हे पाहणे गरजेचे आहे. प्रकाश वेळीप यांनी चुकीचे काहीच म्हटलेले नाही. त्यांनी ही संस्था १४ सदस्यांची असे म्हटलेले नाही. त्यामुळे त्यांना व 'उटा'च्या संघटनेला बदनाम करू नये. 'उटा'ने गेली अनेक वर्षे चांगले काम केले आहे; पण आता काही जण त्यात फूट पाडत आहेत.
मोर्चा काढून दाखवाच
ज्या सदस्यांनी प्रकाश वेळीप व उटाच्या सदस्यांवर आरोप केले, त्यांना आमदार गावडेंनी थेट आव्हान दिले. ते म्हणाले, ही लढाई नेतृत्वाची नाही, तर आदिवासी समाजाच्या आत्मसन्मानाची आहे. जर कोणी समाजाला गुलाम बनवायचा प्रयत्न करीत असेल तर तीव्र विरोध करू. नोंदणी अधिकाऱ्याला देवळात आणा. 'उटा'चे सदस्यही तेथे येतील. आरोप करणाऱ्यांनी हिम्मत असेल तर प्रकाश वेळीपांच्या घरावर मोर्चा काढून दाखवावा, असे आव्हान त्यांनी दिले.