जिल्हा पंचायत निवडणूक २०२५: काँग्रेस, फॉरवर्ड, RGचे जागावाटप अनिश्चित; येत्या २ दिवसांत फैसला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 12:34 IST2025-12-01T12:34:43+5:302025-12-01T12:34:43+5:30
तिन्ही पक्ष भाजपविरोधात युतीनेच लढणार असल्याचे सातत्याने सांगत आहेत.

जिल्हा पंचायत निवडणूक २०२५: काँग्रेस, फॉरवर्ड, RGचे जागावाटप अनिश्चित; येत्या २ दिवसांत फैसला
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा दिवस उजाडला तरी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आरजीचे जागावाटप अजून निश्चित झालेले नाही.
आज किंवा उद्या याबाबत फैसला होईल, असे सांगितले जात आहे. तिन्ही पक्ष भाजपविरोधात युतीनेच लढणार असल्याचे सातत्याने सांगत आहेत. परंतु प्रत्येकजण आपापल्या उमेदवारांचा प्रचारही करत आहेत. गोवा फॉरवर्ड तसेच आरजीच्यावतीने गेल्या पंधरा दिवसांपासून आपली पकड मजबूत असलेल्या मतदारसंघात प्रचार सुरू ठेवला आहे.
दरम्यान, आमदार सरदेसाई यांनी काँग्रेसला ३० तर आरजी व गोवा फॉरवर्डला प्रत्येकी १० जागा असा फॉर्म्युला मांडला होता. गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी युतीच्या प्रश्नावर गोंधळ माजवून युतीला विरोध केला होता. त्यानंतर आरजीचे कार्यकर्तेही खवळले होते. परंतु पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी कार्यकर्त्यांना संयम पाळण्याचे आवाहन केले होते.
'लोकमत'ने रविवारी मनोज परब तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्याशी या प्रश्नावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, आम आदमी पक्षाने या निवडणुकीत एकला चलो रे भूमिका घेत उमेदवारांची पहिली आणि दुसरी यादी जाहीर केली आहे.
युतीचा चेंडू काँग्रेसच्या कोर्टात
जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी युतीचा चेंडू काँग्रेसच्या कोर्टात आहे. आमची काँग्रेस पक्षाबरोबर युती नक्की होणार. गोवा फॉरवर्ड राज्यात दहा तर काँग्रेसने सुमारे ३० जागांवर निवडणूक लढवावी त्यादृष्टीने बोलणे सुरू असून निश्चितपणे युती होईल.
काही उमेदवारांची निवड करून आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून प्रचार सुरू केला आहे. या जागा आम्हालाच मिळतील. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आमची काँग्रेससोबत व इतर पक्षांसोबत युती कायम टिकवून भाजपला धडा शिकवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे, असे सरदेसाई यांनी सांगितले.