कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात बदल; 'शॉर्ट टर्मिनेशन'चा प्रवाशांना फटका, २३ दिवस वाढवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 13:29 IST2026-04-29T13:29:08+5:302026-04-29T13:29:49+5:30
कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात मोठे बदल करण्यात आले आहेत.

कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात बदल; 'शॉर्ट टर्मिनेशन'चा प्रवाशांना फटका, २३ दिवस वाढवले
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १६ व १७ च्या विस्तारीकरणाचे काम वेगाने सुरू असल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात मोठे बदल करण्यात आले आहेत. 'शॉर्ट टर्मिनेशन'ची मुदत आणखी २३ दिवसांनी वाढवण्यात आली असून, हे बदल आता १९ मेपर्यंत लागू राहणार आहेत.
या निर्णयामुळे कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांना सीएसएमटीऐवजी दादर स्थानक किंवा ठाणे स्थानक येथे उतरावे लागणार आहे. प्रमुख बदलांमध्ये मडगाव-मुंबई तेजस एक्सप्रेस (गाडी क्र. २२१२०) ही गाडी आता सीएसएमटीपर्यंत न जाता दादर येथेच थांबणार आहे. तसेच मंगळुरू जंक्शन-मुंबई एक्सप्रेस (गाडी क्र. १२१३४) ही गाडी ठाणे येथेच टर्मिनेट होणार आहे.
याशिवाय, सीएसएमटी-मडगाव साप्ताहिक विशेष (गाडी क्र. ०११७१) या गाडीच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. ही गाडी आता मध्यरात्री १२:२० ऐवजी १२:३० वाजता सुटेल. पुढे ती दादर येथे १२:४२ वाजता पोहोचून १२:४५ वाजता मडगावकडे रवाना होईल.
उन्हाळी सुट्ट्यांमुळे कोकणात प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढलेली असताना हे बदल लागू करण्यात आल्याने प्रवाशांना काही प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता आहे. मात्र प्लॅटफॉर्म विस्तारीकरणामुळे भविष्यात रेल्वे सेवा अधिक सक्षम होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, प्रवाशांनी प्रवासापूर्वी अद्ययावत वेळापत्रक तपासून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.