मित्र म्हणून आला अन् १.८५ कोटी चोरून गेला; संशयितास केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 11:11 IST2025-12-03T11:10:53+5:302025-12-03T11:11:45+5:30
थिवी येथील घटना

मित्र म्हणून आला अन् १.८५ कोटी चोरून गेला; संशयितास केली अटक
लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा: नातीच्या मित्रानेच घरात शिरून सुमारे पावणेदोन कोटी रुपयांवर डल्ला मारल्याचा प्रकार थिवी येथे उघडकीस आला आहे. १ डिसेंबर रोजी हा प्रकार घडला असून, कोलवाळ पोलिसांनी कबीर प्रधान (रा.बागा) याला अटक केली आहे, तर या प्रकरणात कबीर याच्या पसार झालेल्या साथीदाराचा शोध सुरू आहे.
घरात ठेवलेली रोख १ कोटी ८५ लाख रुपयांची रोख रक्कम चोरीस गेल्याचे फिर्यादी चंद्रकांत गाड यांच्या निदर्शनास आले. चौकशीच्या वेळी ही रक्कम नातीच्या मित्राने लंपास केल्याचे आढळून आले.
संशयिताचे फिर्यादीच्या घरी येणे-जाणे सुरू होते. त्यामुळे घरात असलेल्या मोठ्या रकमेची त्याला माहिती होती. फिर्यादीचे कुटुंब घरात नसल्याची संधी साधून संशयिताने आपल्या एका मित्राच्या मदतीने बंद घरात शिरून चोरी केली.
७ लाख रुपये जप्त, इतर रक्कम गुंतवली
या प्रकरणी पोलिसांनी संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी संशयिताकडून चोरीच्या रकमेतील ७ लाख रुपये जप्त केले आहेत. मात्र, इतर रक्कम त्याने गुंतवली असल्याने, ती जप्त करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संदेश कांदोळकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आला आहे.