अटलबिहारी वाजपेयी यांचे देशासाठीचे योगदान चिरंतन: दामू नाईक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 14:08 IST2026-01-04T14:08:19+5:302026-01-04T14:08:59+5:30
मडगाव येथे अटल स्मृती संमेलन

अटलबिहारी वाजपेयी यांचे देशासाठीचे योगदान चिरंतन: दामू नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : भारतभूमीला मोठी परंपरा असून या राष्ट्रात अनेक संत, महंत, साधू, तपस्वी यांनी जन्म घेतला. अशा भूमीमध्ये अनेक राष्ट्रपुरुष होऊन गेले असून त्यांची आठवण करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे त्या राष्ट्रपुरुषांपैकी एक आहेत. त्यांचे देशासाठीचे योगदान चिरंतन आठवणीत राहील, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांनी केले.
येथे भाजपच्या मडगाव, नावेली व फातोर्डा या मंडळांकडून अटल स्मृती संमेलन झाले. यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, सर्वानंद भगत, उपनगराध्यक्ष बबिता नाईक, अभिषेक काकोडकर, नगरसेविका श्वेता लोटलीकर उपस्थित होत्या.
प्रदेशाध्यक्ष नाईक यांनी सांगितले की, त्याकाळी देशाची जी दशा झालेली होती, ती दूर करून त्याला दिशा दाखविण्याचे काम अटलबिहारी वाजपेयी यांनी केले. वाजपेयी हे संघाचे कट्टर स्वयंसेवक होते. त्यांनी आपले जीवन संघकार्यासाठी वाहिले. ते असे एकमेव नेते आहेत ज्यांनी अकरा वेळा लोकसभा निवडणूक जिंकली. दोनवेळा राज्यसभेवर निवडून आले व चार राज्यांत त्यांनी निवडणुका लढविल्या. ते सर्वव्यापी नेते होते. त्यांच्याकडे विनोदबुद्धी त्याचप्रमाणे हजरजबाबीपणा होता. तीच परंपरा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी व सहकारी आमच्या देशाला विश्वगुरू बनविण्याचे स्वप्न बाळगून पुढे जात आहेत.
आमदार तुयेकर यांनीही विचार मांडले. शेख जिना, सुहास कामत, जयेश सिंगबाळ, सरमेंटो डिसिल्वा, अॅड. सुभाष काणेकर, वासुदेव विर्डीकर, राजकुमार झांजी, सोमनाथ आमोणकर, जगदीश प्रभुदेसाई या कार्यकर्त्यांचा सत्कार झाला.
वाजपेयींचा आदर्श घेतल्यास राजकारण सुधारेल : कामत
माझ्या राजकीय कारकिर्दीत वाजपेयी त्यांचे कार्य मला जवळून पाहायला मिळाले. ते एक दिलदार, राष्ट्रासाठी काहीही करणारे व्यक्तिमत्त्व होते. राष्ट्र आधी ही त्यांची विचारसरणी होती. राजकारणात वाजपेयींचा आदर्श ठेवून काम करायला हवे तरच आमचे राजकारण सुधारेल याचे मला खात्री आहे, असे मंत्री कामत म्हणाले.