तब्बल ६३ दिवसांनंतर ओंकार पुन्हा गोव्यात दाखल; वनखात्याची झोप उडाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 12:41 IST2025-12-01T12:41:04+5:302025-12-01T12:41:25+5:30
हत्ती काही प्रमाणात माणसाळल्याचे दिसून येत होते.

तब्बल ६३ दिवसांनंतर ओंकार पुन्हा गोव्यात दाखल; वनखात्याची झोप उडाली
लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : तब्बल ६३ दिवसांनंतर ओंकार हत्तीने पुन्हा महाराष्ट्रातून गोव्याच्या हद्दीत प्रवेश केला. काल, रविवारी दुपारी तो पत्रादेवी फकीरपाटो येथे आला. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. वनखात्याचे कर्मचारी ओंकार हत्तीवर नजर ठेवून आहेत. हत्तीने जास्त नुकसान करू नये, यासाठी सुतळी बॉम्ब लावून त्याला इतरत्र पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सुमारे दोन महिन्यांपूर्वी ओंकार हत्ती मोपा, फकीरपाटो, तोरसे, तांबोसे या परिसरात धुमाकूळ घालत होता. हत्तीने शेतकऱ्यांच्या पिकांचे सहा लाखांपेक्षा अधिकचे नुकसान केले, नंतर तो दोन महिने महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीत बांदा, इन्सुली परिसरात होता. हत्ती काही प्रमाणात माणसाळल्याचे दिसून येत होते.
वनखात्याचे अधिकारी हत्तीला पिटाळून लावण्याचा प्रयत्न करत होते. काही जणांनी हत्तीवर सुतळी बॉम्ब टाकून त्याला जखमी करण्याचाही प्रयत्न केला होता. महाराष्ट्राच्या वनखात्याला हत्तीचा बंदोबस्त करता आलेला नाही.
त्यामुळे तो काल पेडणे तालुक्यात पत्रादेवी, फकीरपाटो परिसरात आला. सुरुवातीला कर्नाटकातील हत्तींच्या कळपातून ओंकार वाट चुकून गोव्यात आला. तो तेव्हा मोपा, तोरसे, तांबोसे परिसरात होता. दहा दिवसांनंतर तो थेट बांदा, इन्सुलीकडे गेला होता.
वनखात्याची झोप उडाली
ओंकार हत्तीने फकीरपाटो येथे प्रवेश केल्याची माहिती समजताच, वनखात्याची झोप उडाली आहे. वनखात्याचे कर्मचारी त्याचा बंदोबस्त करण्यासाठी सुतळी बॉम्ब घेऊन पळत सुटल्याचे चित्र दिसून आले.