सहा वर्ष पूर्ण झाल्यानंतरच यापुढे पहिलीत प्रवेश; मुख्यमंत्र्यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 13:05 IST2025-10-03T13:05:06+5:302025-10-03T13:05:06+5:30
कुडणे सरकारी शाळेला मनोहर पर्रीकर यांचे नाव.

सहा वर्ष पूर्ण झाल्यानंतरच यापुढे पहिलीत प्रवेश; मुख्यमंत्र्यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : येत्या शैक्षणिक वर्षापासून सहा वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच पहिलीमध्ये प्रवेश मिळेल. नवीन शैक्षणिक धोरणानुसार या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे गोव्यात सुमारे ४ हजार विद्यार्थ्यांच्या प्रवेशात घट होऊ शकते. ही तूट २०२७सालच्या शैक्षणिक वर्षापासून भरून निघेल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.
फाळवाडा- कुडणे येथील सरकारी प्राथमिक शाळेला माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्यात आले. या नामकरण सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, कुडणेचे सरपंच बाबला मळीक, उपसरपंच दीपिका नाईक, पंचसदस्य राजन फाळकर, पूर्वा मळीक, सुनिधी कामत, दामोदर पेटकर, श्रीकांत चिकणेकर, सचिव सुजाता मोरजकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
पालकांना आपल्या पाल्याचा पाच वर्षांचा झाल्यावर पहिलीत प्रवेश अपेक्षित असतो व त्यासाठी सर्वच पालक आग्रही असतात. पण मुलाच्या मानसिक व बुद्धी क्षमतेचा विचार कोणीही करत नाही. मुलांवर लहान वयातच अभ्यासाचा ताण पडू नये यासाठी सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणात विचार करण्यात आलेला आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
गोव्यातील सर्व सरकारी प्राथमिक शाळांना नवीन साज देण्याचे काम हे २०१२ साली स्थापन झालेल्या माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर नेतृत्वाखालील भाजप सरकारने केले. ग्रामीण भागातील सरकारी शाळांमध्ये मात्र स्थानिक विद्यार्थी भरती केले जात नसल्याने या शाळांच्या पटसंख्येत घट होत आहे, ही खंत आहे.
गावातील विद्यार्थ्यांचा शहरातील शाळांमध्ये प्रवेश करणे किंवा गावातील कुटुंबे शहरांमध्ये स्थलांतर होणे. यामुळे आज ग्रामीण भागातील जास्त शाळांमध्ये परप्रांतीय लोकांची मुले अधिक दिसतात, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
सरपंच बाबला मळीक यांनी सांगितले की, मनोहर पर्रीकर यांनी घेतलेल्या काही धाडसी निर्णयामुळे त्यांची प्रतिमा ही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरही चमकली. कुडणेतील सरकारी प्राथमिक शाळेला त्यांचे नाव देण्यात आले आहे. या शाळेची पटसंख्या तशी कमीच आहे, मात्र आता या भागातील लोकांनी आपल्या मुलांना या शाळेत घालून या शाळेसह स्व. मनोहर पर्रीकर यांचेही नाव टिकवून ठेवण्याची जबाबदारी स्वीकारावी लागेल.
पंचसदस्य राजन फाळकर यांनी ही शाळा म्हणजे माजी मुख्यमंत्री स्व. पर्रीकर यांनी फाळवाड्यासाठी दिलेली एक भेट आहे, असे सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या शाळेला स्व. मनोहर पर्रीकर यांच्या नावाच्या पाटीचे अनावरण करून नामकरण केले.
शाळा टिकविण्यासाठी पालकांनी लक्ष द्यावे
पर्रीकरांची गोव्यातील शैक्षणिक व्यवस्था तसेच शैक्षणिक पातळीवरील साधनसुविधा सुधाराव्या यासाठी स्व. मनोहर पर्रीकर यांनी मोठी कामगिरी बजावली आहे. फाळवाडा कुडणे येथील या सरकारी प्राथमिक शाळेची आधुनिक इमारत ही स्व. मनोहर पर्रीकर यांचीच भेट होती. परंतु अशा शाळा टिकवून ठेवण्यासाठी पालकांनी विशेष लक्ष द्यावे, असे मुख्यमंत्री म्हणाले.