केतन भाटीकर नावाचे चैतन्यमय वादळ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 13:39 IST2026-05-16T13:38:52+5:302026-05-16T13:39:53+5:30

केतनची व्यवसायाची अॅकॅडेमिक बाजू भक्कम होती. मोठमोठ्या क्रिकेटपटूंना व अॅथलेटना त्याने स्नायू दुखापत, मैदानावरील इमर्जन्सीबाबत मार्गदर्शन केलं होतं.

a vibrant storm named ketan bhatikar silent forever | केतन भाटीकर नावाचे चैतन्यमय वादळ...

केतन भाटीकर नावाचे चैतन्यमय वादळ...

मुकेश थळी साहित्यिक, कोशकार

सकाळी सहा वाजता उठलो. वॉट्सअॅप उघडलं. आणि हादरलो. केतन भाटीकर गेला.. बातमी चुकीची आहे, घाई करतात नुसते, म्हणत अजून काही बातम्या बघितल्या.. तर दोन-तीन वाहिन्यांच्या बातम्या होत्या. बातमी खरी होती. मृत्यू ट्रॉमॅटीक होता. अपार दुःख झालं. माझी बहीण नंदिनी उठल्यावर तिला ही बातमी सांगितली. तर तिचे अश्रू थांबेचनात. केतन ४ वर्षाचा होता तेव्हापासून ती त्याला ओळखते. डॉ. केतन आणि मोठा भाऊ डॉ. कौतुक यांचं तिला भारी कौतुक. त्यांचे वडील कीर्तीकुमार भाटीकर व नंदिनी यांनी फोंड्याच्या मिनेझिस औषध कंपनीत बरोबर काम केलं होतं. कालांतराने माझ्या बहिणीने फोंड्यात फार्मसी सुरू केली. तेव्हा कधीही भाटीकर मंडळी भेटली तर ती मला आवर्जून सांगायची.

केतन हा जात्याच डायनॅमिक. चैतन्यदायी. ऊर्जेने भरलेला. अनेक क्षेत्रात त्याची मुशाफिरी. समाजसेवा हे एक. फिजिओथेरपी हा त्याचा व्यवसाय. तिथं त्याच्या साहाय्यकांची एक टीम होती. सर्जरीनंतर किंवा अन्य कारणास्तव रुग्णांना फिजिओथेरपी लागते. या त्यांच्या क्लिनिकचा लौकिक होता. 

समाजसेवा करणाऱ्या केतनच्या टीमसोबत त्याने केलेल्या कार्याला तोड नाही. कोविड योद्धे म्हणून या टीमने केतनच्या नेतृत्वाखाली जे धाडसी कार्य केले ते अनमोल होय. चिटपाखरू बाहेर फिरकत नसे. लॉकडाऊनचे निर्बंध. मी गाडीला सरकारी पास डकवून फोंड्याहून पणजीला आकाशवाणीवर वृत्तनिवेदनासाठी जात असे. त्यावेळी मी डॉ. केतन व त्याच्या स्वयंसेवकांच्या टीमला गरिबांना औषधं व अन्न-धान्य पुरवठा करताना नेहमी पाहात असे. 

या काळात मुळातच धडाडीच्या नेतृत्वानं हे काम करणं म्हणजे अग्निदिव्य होतं. कारण कोविडच्या पेशंटना मदत करणं, त्यांना तातडीनं हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्याचं काम करणं जिकिरीचं, धोक्याचं होतं. कोविडला आमंत्रित करण्यासारखंच धोक्याचं होतं. ते काम केतनची टीम करत होती.

नेत्रविकारतज्ज्ञ डॉ. श्वेता खांडेपारकर यांचा केतन हा मामेभाऊ. श्वेता-मंदार यांच्या आमच्या ओळखीमुळे केतनचं जास्त कोडकौतुक. सख्खा भाऊ नसल्याने डॉ. श्वेता यांना केतन कौतुक सख्ख्या भावासारखेच. रक्षाबंधन भाऊबीजेसाठी व अगत्याने येणाऱ्या श्वेताचा केतनलाही अभिमान होता. केतनच्या आठवणी खूप आहेत. 

आम्ही एकदा खांडेपारला श्री दत्तमंदिरात गेलो होतो. केतन तिथं बसला होता. ताबडतोब त्यानं मला व बहिणीला अभिवादन केलं. त्याचे आई-वडील पूजाविधी करत होते. श्रीगुरुचरित्राच्या समारोपाची पूजा होती. केतनचा भाऊ कौतुकही भेटला. कीर्तीकुमार हे अगदी धार्मिक वृत्तीचे सद्‌गृहस्थ.

डॉ. केतनचं व्यक्तिमत्त्व तरुणाईला साजेसं. तरतरीत, रुबाबदार. अभिनेत्यासारखं. त्यानं फिजिओथेरपीत मास्टर्स डिग्री घेतली होती. युरोपला जाऊन खास अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केला होता. खेळाडूंसाठी फिजिओथेरपीचे विविध मानदंड, आयाम, व्यायाम, तंत्र मंत्र प्रशिक्षित करण्याचं काम तो खेळाडूच्या उमेदीने करायचा. 

माझा पत्रकार मित्र संजय बोरकरबरोबर पणजीहून परतताना अनेकदा संजयला केतनचे फोन यायचे. फिजिओथेरपीच्या त्याच्या व्याख्यानासाठी वा लेखांसाठी योग्य मराठी-कोंकणी शब्दांसाठी तो संजयची मदत घ्यायचा. आपल्या या व्यवसायासंदर्भात व्याख्यानांसाठी तो गोव्याबाहेरही जायचा. त्याची व्यवसायाची अॅकॅडेमिक बाजू भक्कम होती. त्यात आत्मविश्वास होता. 

मोठमोठ्या क्रिकेटपटूंना व अॅथलेटना केतनने स्नायू दुखापत टाळणे, उपचार, मैदानावरील इमर्जन्सी व इतर बाबींसंदर्भात आजवर बहुमोल मार्गदर्शन केलं. त्यासाठी तो बाहेरगावीही जायचा. यामुळे त्याचं अनुभवविश्व विस्तारलं होतं. केतनच्या संघटनेनं रक्तदान शिबिरं घेतली. यासंदर्भात जागृती केली. कैक क्षेत्रं चिन्हांकित करून आपली नाममुद्रा उमटवली. गोव्याच्या इतिहासात अमीट छाप पाडणारं हे कार्य तरुणाईला कायम प्रेरणादायी ठरेल.

पाच वर्षांपूर्वी आमची माई गेली तेव्हा केतन व त्याची टीम खास कॅस्केट घेऊन आली. त्यांनी मृतदेह आत ठेवून शीतपेटीसारखी ही यंत्रणा कार्यान्वित केली. केतनने माझे अश्रू पुसले. काहीही लागल्यास कळवा, खंबीर राहा म्हणाला. त्यांची ही जनसेवा निर्हेतुक होती. मी त्याप्रसंगी खचलो असतो, पण केतनासारख्यांनी ऊर्जा दिली. आपण मनुष्य आहोत, एकमेकांना धीर दिलाच पाहिजे. पण पुत्रशोकाने विव्हल केतनच्या आई-वडिलांचे अश्रू पुसण्याचे धैर्य आमच्यात नाही. पुत्रशोक अकल्पनीय असतो. तो सहन करायला, पचवायला त्यांना सहनशक्ती दे, इतकीच प्रभूचरणी प्रार्थना.

Web Title : केतन भाटीकर: सेवा और प्रेरणा का एक गतिशील जीवन

Web Summary : केतन भाटीकर, एक गतिशील फिजियोथेरेपिस्ट और समर्पित समाज सेवक को याद करते हुए। कोविड-19 महामारी के दौरान उनके प्रभावशाली योगदान और सामुदायिक सेवा के प्रति प्रतिबद्धता ने गोवा में एक स्थायी विरासत छोड़ी, जिसने कई लोगों को अपनी ऊर्जा और निस्वार्थता से प्रेरित किया। उनकी बहुत याद आएगी।

Web Title : Ketan Bhatikar: A Dynamic Life of Service and Inspiration

Web Summary : Remembering Ketan Bhatikar, a dynamic physiotherapist and dedicated social worker. His impactful contributions during the COVID-19 pandemic and commitment to community service left a lasting legacy in Goa, inspiring many with his energy and selflessness. He will be dearly missed.