शेतात धानाचे पुंजने टाकण्यासाठी गेले आणि काळाने गाठले; वीज कोसळून एका युवकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी
By दिगांबर जवादे | Updated: October 25, 2025 20:14 IST2025-10-25T20:13:29+5:302025-10-25T20:14:19+5:30
Gadchiroli : विजेचा जबर धक्का बसल्याने सरगमचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर योगेश गंभीर जखमी झाला. नागरिकांच्या मदतीने याेगेशला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Went to the field to plant paddy and got caught in the act; One youth died and another was seriously injured after being struck by lightning
गडचिराेली : काेरची तालुक्यातील केसालडाबरी (बोदालदंड) शेतशिवारात शनिवारी दुपारी वीज काेसळल्याने एक युवक जागीचा ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला.
सरगम सोमनाथ कोरचा (वय १७, रा. केसालडाबरी) असे मृत तरुणाचे नाव आहे, तर त्याचा मित्र योगेश गावडे (१९, रा. गुजरबडगा, ता. देवरी, जि. गोंदिया) हा गंभीर जखमी झाला असून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय, गोंदिया येथे हलविण्यात आले आहे. सरगमचे वडील साेमनाथ काेरचा यांच्यासाेबत मृत सरगम व याेगेश हे शेतात धानाचे पुंजने टाकण्यासाठी गेले हाेते. काम सुरू असतानाच अचानक विजेचा कडकडाट सुरू झाला. त्यावेळी मृत सरगम आणि त्याचा मित्र योगेश हे दोघे झाडाखाली आसरा घेण्यासाठी उभे राहिले, तर सोमनाथ काही अंतरावर थांबले. त्याचवेळी प्रचंड गडगडाटासह वीज कोसळली आणि ती थेट त्या झाडावर पडली. विजेचा जबर धक्का बसल्याने सरगमचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर योगेश गंभीर जखमी झाला. नागरिकांच्या मदतीने याेगेशला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.