धानोरा येथे आदिवासी विकास महामंडळअंतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमार्फत धानाची खरेदी केली जाते. या वर्षी भरपूर धान पीक झाल्याने तसेच सरकारने धानाला योग्य भाव व बोनस जाहीर केल्याने शेतकऱ्यांनी आपले धान आधारभूत खरेदी केंद्रावरच विकण्यास प्राधान्य दिले. यामुळे खरेदी केंद्रावर धानाची आवक वाढली. डिसेंबर महिन्यात धान खरेदी केंद्र सुरू झाले. येथील शासकीय गोडाऊनची धान साठवणूक क्षमता सहा हजार क्विंटल आहे. गाेदाम लवकरच भरले, परंतु धानाची उचल न झाल्याने व शेतकऱ्यांचा रेटा वाढल्याने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता उघड्यावर धान खरेदी करण्यात आली. दहा हजार क्विंटल धान उघड्यावर ताडपत्री झाकून ठेवण्यात आला आहे. आतापर्यंत केवळ ५०० क्विंटल धानाची उचल करण्यात आली आहे. रविवारला रात्री २ वाजताच्या सुमारास धानोरा येथे मुसळधार पाऊस आल्याने उघड्यावर ठेवलेले शेकडो क्विंटल धान खराब हाेण्याची शक्यता आहे. येथील धानाची उचल करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
अवकाळी पावसाने धानोरा केंद्रावरील धान भिजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:39 IST