‘सिझेरियन’ प्रसूतीनंतर दोन मातांचा मृत्यू, आरोग्य यंत्रणेत खळबळ

By दिलीप दहेलकर | Published: September 29, 2023 06:14 PM2023-09-29T18:14:28+5:302023-09-29T18:16:06+5:30

जिल्हा महिला रुग्णालयातील प्रकार

Two mothers die after 'Cesarean' delivery in Gadchiroli District hospital, stir in health system | ‘सिझेरियन’ प्रसूतीनंतर दोन मातांचा मृत्यू, आरोग्य यंत्रणेत खळबळ

‘सिझेरियन’ प्रसूतीनंतर दोन मातांचा मृत्यू, आरोग्य यंत्रणेत खळबळ

googlenewsNext

गडचिरोली : शहरातील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात ‘सिझेरियन’ प्रसूतीनंतर दोन महिलांचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. दरम्यान मृतकांच्या नातेवाईकांनी उपचारात हयगय झाल्यामुळे दोघींनाही जीव गमवावा लागल्याचा आरोप केला आहे. दरम्यान दोन्हीही मातांचे बाळ सुखरूप असून एकीचे बाळ रुग्णालयात तर दुसरीकडे बाळ नातेवाईकांनी घरी नेले आहे. रजनी प्रशांत शेडमाके (२३) रा. शिवणी ता. गडचिरोली. व उज्ज्वला नरेश बुरे (२७), रा.मुरखळा चक,ता.चामोर्शी (हल्ली मुक्काम इंदिरानगर, गडचिरोली) अशी मृत महिलांची नावे आहेत.

रजनी शेडमाके हिला प्रसुतीसाठी २२ सप्टेंबर तर उज्ज्वला बुरे हीला २४ सप्टेंबर रोजी महिला रूग्णालयात भरती करण्यात आले. तपासणीनंतर दोघींचीही २४ सप्टेंबर रोजी शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करण्यात आली. दरम्यान दोन दिवस या दोन्ही माता सुखरूप होत्या. मात्र चौथ्या दिवशी रजनी शेडमाके व उज्ज्वला बुरे हिला ताप आला. दरम्यान प्रकृती खालावल्याने लागलीच जिल्हा सामान्य रूग्णालयातून फिजीशीयनला बोलाविण्यात आले.

त्यानंतर २७ सप्टेंबरला दोघींनाही जिल्हा व सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु सायंकाळी रजनी शेडमाके हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर उज्ज्वला बुरे हिला नागपूरला हलविण्याचा सल्ला देण्यात आला. दरम्यान, नागपूरला नेण्यात येत असताना रात्री ११ वाजताच्या सुमारास आरमोरीजवळ उज्ज्वला बुरे हिनेही प्राण सोडला. दोघींचेही बाळ सुखरुप आहेत. परंतु आईविना दोघेही पोरके झाले आहेत. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दोन्ही महिलांना जीव गमवावा लागल्याचा आरोप मृतकांच्या नातेवाईकांनी केला आहे.

समिती करणार चौकशी 

सदर दोन मातांचा मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली चार तज्ज्ञांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण कळेल. यात कुणी दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले.

सदर दोन मातांचा मृत्यू कशामुळे झाला हे आताच सांगता येत नाही. चौकशी समितीचा अहवाल व शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यावर मृत्यूचे नेमके कारण कळणार आहे. 

- डॉ. माधुरी किलनाके, वैद्यकीय अधिक्षक, जिल्हा महिला व बाल रूग्णालय, गडचिरोली.

Web Title: Two mothers die after 'Cesarean' delivery in Gadchiroli District hospital, stir in health system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.