बैलगाडी ते मोटारकारपर्यंतच्या प्रवासात झाडीपट्टी रंगभूमी समृद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 12:13 AM2018-11-05T00:13:20+5:302018-11-05T00:14:08+5:30

देशात क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसऱ्या स्थानावर असलेल्या, महाराष्ट्र राज्याच्या आग्नेय, पूर्व आणि ईशान्य दिशांना चिकटून असलेल्या वनजिल्हा गडचिरोली, कोळसाजिल्हा चंद्रपूर, तांदूळजिल्हा गोंदिया, तलावजिल्हा भंडारा या चार जिल्ह्यांच्या भूपट्ट्याला झाडीपट्टी म्हणतात.

Tremendous theater in the journey from the bullock cart to the motorbike | बैलगाडी ते मोटारकारपर्यंतच्या प्रवासात झाडीपट्टी रंगभूमी समृद्ध

बैलगाडी ते मोटारकारपर्यंतच्या प्रवासात झाडीपट्टी रंगभूमी समृद्ध

googlenewsNext

अतुल बुराडे/विष्णू दुनेदार।
लोकमत न्यूज नेटवर्क
विसोरा/तुळशी : देशात क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसऱ्या स्थानावर असलेल्या, महाराष्ट्र राज्याच्या आग्नेय, पूर्व आणि ईशान्य दिशांना चिकटून असलेल्या वनजिल्हा गडचिरोली, कोळसाजिल्हा चंद्रपूर, तांदूळजिल्हा गोंदिया, तलावजिल्हा भंडारा या चार जिल्ह्यांच्या भूपट्ट्याला झाडीपट्टी म्हणतात. याच झाडीपट्टीत अनेक वर्षांपूर्वीपासून दंडार, तमाशा, राधा, डहाका, खडीगंमत आणि नाटक असे विविध कलारंग सादर होत आहेत. त्यामुळे झाडीतील कलारंगभूमी झाडीपट्टी रंगभूमी म्हणून प्रसिद्ध झाली. आज दिवाळीनंतर गावागावात सादर होणारी नाटकं हे झाडीपट्टीचं एक वैशिष्ट्य आहे. टीव्ही, केबल, डिश, सिनेमा आणि आता सोशल मिडीयाच्या आक्रमणातही झाडीपट्टीत नाटकांची परंपरा टिकून आहे.
एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस झाडीपट्टीत नाटकांनी खºया अर्थाने पाऊल टाकले. त्याआधी दंडार हीच येथील अस्सल झाडीबोलीतील खरीखुरी ओळख. विशेष दिनी वा सण, समारंभाला दंडारीचे प्रयोग सादर केले जायचे. अशिक्षित ज्यांना गावकूसाबाहेरचे विश्व माहित नाही, आपल्या सोयºयांच्या दोनचार गावाशिवाय कधी कुठे फिरले नाही, अशा लहान ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी स्वनिर्मित, स्वकल्पीत, स्वरचित संहितेवर दंडार सादर करून तिला जिवंत ठेवण्याचे अलौकिक काम येथील झाडीतल्या लोकांनी आणि रसिक प्रेक्षकांनी केले. सारे काही पारंपरिक, आधुनिकतेचा कुठेही अंशभर सुद्धा लवलेश नाही. मात्र रंगमंचावर उभे होताच त्या कलेत इतके रमून जायचे की साक्षात ते पात्र त्या रंगमंचावर अवतरले की काय? अशी जिवंत अनुभूती रसिकांना व्हायची. दंडार, नाटकातील कला, कलावंत आणि पडद्यामागच्या सर्व सहयोगींवर रसिकांकडून आपुलकीच्या सरींप्रमाणे सतत प्रेम बरसायचे. आजपासून ५० वर्षांपूर्वी अर्धाअधिक प्रदेश जंगलव्याप्त होता. रस्ते नाही, संपर्कसाधनांचा अभाव, हौशी रंगभूमीचे उच्च स्थान, त्यामुळे बाहेरगावी नाटक आयोजित करणे म्हणजे खूपच कठिण, आव्हानात्मक आणि जोखमीचे काम होते. १९६० पूर्वी व्यावसायिक रंगभूमींच्या निर्मिती आधी हौशी रंगभूमी हीच येथील खरीखुरी ओळख होती. नाटकात गावातीलच पुरुष कलाकार पुरुष आणि स्त्री असे दोन्ही पात्र रंगवत असे. इतर अनेक साधन-साहित्य गावामध्येच तयार करीत असत. आणि जर बाहेरगावी नाटक करायचे असेल तर कलाकार, सिरसिनरी यांची ने-आण करण्यासाठी बैलगाडी, खेचर यांचा वापर केला जायचा. रस्ते बरोबर नव्हते. त्यामुळे नाटकास्थळी पोहोचण्यासाठी वेळेच्या खूप आधी निघावे लागायचे. जर बैलगाडी पुढे जाऊ शकली नाही तर पायदळ वाट पूर्ण करावी लागत असे.
विशेष म्हणजे नाटकात संगीतसाथ देण्यासाठी लागणाºया आॅर्गन वाद्याला नाटकस्थळी आणण्यासाठी त्या गावातील एकदोन व्यक्ती देसाईगंजसारख्या ठिकाणावरुन आॅर्गन डोक्यावर वाहून आणत असत. पायदळ फिरून, बैलगाडी नंतर सायकल, एसटीबसचा वापर करून पंचक्रोशीतील गावोगावी फिरून पॉम्प्लेट चिकटवून नाटक प्रचार आणि प्रसार होत असे. पुढे १९६० नंतर दळणवळणाची साधने आणि व्यावसायिक रंगभूमी तयार झाली. आता नाट्य रंगभूमी या एकाच छताखाली स्त्री, पुरुष कलाकार, नेपथ्य, प्रकाश, आर्ट, संगीतकार, डेकोरेशन, तिकीट, पॉम्प्लेट सारेच मिळते. त्यामुळे चक्क स्पेशल गाडीने कलाकार, प्रॉम्प्टर, संगीतसाथ देणारे आणि डेकोरेशन नाटक ज्या ठिकाणी असेल तिथे पोहोचविले जातात.
१९६०-७० पर्यंत झाडीपट्टी रंगभूमी पूर्णत: हौशी होती. मात्र त्यानंतर अत्याधुनिक साधने, साहित्य आणि बदलत्या मानसिकतेने नाटक, कलाकार, आणि अन्य ज्या गोष्टी नाटक उभारण्यासाठी लागतात त्या सर्व एकाच ठिकाणी मिळणे सुरू झाल्याने झाडीपट्टी रंगभूमीतील नाटके व्यावसायिक रंगभूमीकडे वळू लागली. अखेर व्यावसायिकता आल्याने पैसा वाढू लागला परिणामी आता झाडीपट्टी रंगभूमी काही अंशी सोडल्यास ती व्यावसायिक रंगभूमी म्हणूनच वाटचाल करीत आहे.
आज सोशल मिडिया, माहिती तंत्रज्ञानाच्या जगातही कायम मागासलेपणाचा शब्द लावून हीनवल्या जाणाºया आणि नक्षलवादाचा शाप बसलेला गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या चार जिल्ह्यांच्या झाडीपट्टीमधील झाडीपट्टी रंगभूमी आजही इतक्या ऐटीत आपला साजशृंगार मिरवीत आहे की, साºयांना नवल वाटेल. सांस्कृतिक क्षेत्रात नवनवे शोध आणि कल्पना उभारून हॉलिवूड, बॉलिवूड, टॉलिवूडवाले आपणच श्रेष्ठ असल्याचे बोलतात; मात्र या सर्वांमध्ये झाडीपट्टी रंगभूमी अर्थात ‘झाडीवूड’ कुठेही मागे नाही.
 

Web Title: Tremendous theater in the journey from the bullock cart to the motorbike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.