गडचिरोलीच्या सात ग्रामीण रुग्णालयांत स्त्रीरोग तज्ज्ञ नाही; कसा होईल उपचार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 19:09 IST2026-01-05T19:00:03+5:302026-01-05T19:09:54+5:30

गर्भवती महिलांची होतेय हेळसांड : गुंतागुंतीच्या प्रसूतीमुळे माता व बाळमृत्यूचे वाढते प्रमाण

There is no gynecologist in seven rural hospitals in Gadchiroli; How will treatment be provided? | गडचिरोलीच्या सात ग्रामीण रुग्णालयांत स्त्रीरोग तज्ज्ञ नाही; कसा होईल उपचार ?

There is no gynecologist in seven rural hospitals in Gadchiroli; How will treatment be provided?

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात कोट्यवधी रुपये खर्चुन भव्य शासकीय रुग्णालये उभारण्यात आली आहेत. विविध आरोग्य योजना, सुविधा आणि आधुनिक इमारती उभ्या राहिल्या असल्या तरी प्रत्यक्षात गर्भवती महिला व गंभीर रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने आरोग्य व्यवस्थेचे अपयश पुन्हा एकदा उघड झाले आहे.

एटापल्ली तालुक्यातील आलदंडी टोला येथील माता-बाळ मृत्यू प्रकरणामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सात ग्रामीण रुग्णालयांत स्त्रीरोग तज्ज्ञच नसल्याने गर्भवती महिलांवर उपचार कसे होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

जिल्ह्याच्या शहरी भागात रुग्णसेवेसाठी एकूण १५ शासकीय रुग्णालये कार्यरत आहेत. यामध्ये गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा महिला व बाल रुग्णालय, तसेच कुरखेडा, अहेरी व आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयांचा समावेश आहे. अहेरी येथे नव्याने महिला व बाल रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. आरोग्य विभागातर्फे सेवांबाबत प्रभावी जनजागृती नसल्याने दुर्गम, अतिदुर्गम भागातील अनेक नागरिक पुजाऱ्याकडे जाऊन उपचार करतात. 

गर्भवतींचा जीव धोक्यात

चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, धानोरा, देसाईगंज, कोरची व आष्टी अशा नऊ ठिकाणी ग्रामीण रुग्णालये आहेत. यापैकी गडचिरोली, अहेरी, आरमोरी, धानोरा व चामोर्शी या पाच ठिकाणी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती असून तेथे महिलांना उपचार मिळत आहेत. मात्र, उर्वरित सात ग्रामीण रुग्णालयांत स्त्रीरोग तज्ज्ञांचा पूर्णतः अभाव आहे. त्यामुळे गंभीर गर्भवती महिलांना अहेरी किंवा गडचिरोली येथे रेफर केले जात असून त्यांचा जीव धोक्यात येत आहे.

२५ अतिरिक्त सीएस, निवासी वैद्यकीय अधिकारी नाहीत

डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या एकूण १५ रुग्णालयात वर्ग १ च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची एकूण ४१ पदे मंजुर आहेत. यापैकी १६ पदे कार्यरत असून तब्बल २५ पदे गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहेत.

ग्रामीण रुग्णालयांत 'सिझर'ची सुविधाच नाही

जिल्ह्यात एकूण नऊ ग्रामीण रुग्णालये आहेत. त्यापैकी धानोरा, भामरागड व चामोर्शी या तीन रुग्णालयांना आयपीएचएस दर्जा देण्यात आला आहे. या रुग्णालयांत स्त्रीरोग-प्रसूती तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ व २ भूलतज्ज्ञांची पदे मंजूर असून प्रत्यक्षात भामरागड येथील सर्व पदे रिक्त आहेत. परिणामी येथे सिझर प्रसूतीची सुविधा नसून गंभीर गर्भवती महिलांना अहेरी किंवा गडचिरोली येथे पाठवले जाते. दरम्यान, गडचिरोली येथे गर्भवती महिला पोहोचेपर्यंत विलंब होत असल्याने दोघांच्याही जीवाला धोका होत असतो.

'रुग्ण रेफर टू' गडचिरोली

उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव आहे. त्यामुळे गुंतागुंतीच्या प्रसूतीसाठी ऐनवेळी गडचिरोलीच्या महिला व बाल रुग्णालयात संपूर्ण जिल्हाभरातून गर्भवती महिलांना रेफर करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. गडचिरोली येथील महिला रुग्णालयात रूग्णांसाठी चांगल्या सुविधा आहेत. मात्र खाटांच्या क्षमतेपेक्षा अधिक रूग्ण दाखल होत असल्याने येथील सुविधाही तोकड्या पडत आहेत.

नव्या महिला रुग्णालयाला आयपीएचएसचा दर्जा द्या

अहेरी येथे नव्यानेच जिल्हा महिला व बाल रुग्णालय कार्यान्वित करण्यात आले आहे. या रुग्णालयाला आयपीएचएसचा दर्जा दिल्यास येथे सिजर प्रसूती करणारे तज्ज्ञ डॉक्टर नियमित उपलब्ध होऊ शकतात. कारण अशा डॉक्टरांना मासिक वेतन ७० हजार रूपये व प्रति सिजर प्रसूतीला ४ हजार रूपये देय असतात.

"जिल्हा आरोग्य विभागातील वर्ग १ व वर्ग २ मधील रिक्त अधिकाऱ्यांची तसेच तज्ज्ञ डॉक्टरांच्या रिक्त पदांबाबतची संपूर्ण माहिती शासन व वरिष्ठांकडे सादर करण्यात आली आहे. कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञाच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे."
- वर्षा लहाडे, जिल्हा शल्यचिकित्सक, गडचिरोली


   

Web Title : गढ़चिरोली: ग्रामीण अस्पतालों में स्त्री रोग विशेषज्ञ नहीं, इलाज पर सवाल।

Web Summary : गढ़चिरोली के ग्रामीण अस्पतालों में स्त्री रोग विशेषज्ञों की कमी से गर्भवती महिलाओं का जीवन खतरे में है। सात अस्पतालों में विशेषज्ञ नहीं हैं, जिससे उन्हें गढ़चिरोली या अहेरी रेफर किया जा रहा है। रिक्तियां और सुविधाओं की कमी से स्थिति और खराब हो रही है, जिससे प्रसव के दौरान जोखिम बढ़ रहे हैं। नए अस्पताल को बेहतर सुविधाओं की जरूरत है।

Web Title : Gadchiroli: No gynecologists in rural hospitals, treatment in question.

Web Summary : Gadchiroli's rural hospitals lack gynecologists, endangering pregnant women. Seven hospitals lack specialists, forcing referrals to Gadchiroli or Aheri. Vacancies and lack of facilities worsen the situation, increasing risks during childbirth. New hospital needs better facilities.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.