लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड (जि. गडचिरोली) : कर्जबाजारीपणाला कंटाळून ३८ वर्षीय तरुण शेतकरी अशोक देवराव बोधनकर यांनी ११ मे रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना आरमोरी तालुक्यातील वैरागड येथे घडली. विशेष म्हणजे, १२ वर्षांपूर्वी याच दिवशी त्यांच्या वडिलांचाही संशयास्पद मृत्यू झाला होता. या योगायोगाने संपूर्ण गाव सुन्न झाले आहे.
सध्या सर्वत्र रब्बी हंगामातील धान मळणीची लगबग सुरू आहे. सोमवारी सकाळी अशोक हे शेतात गेले होते. सकाळी १०:३० च्या सुमारास ते शेतावरून घरी परतले. आई शेतात होती, तर पत्नी मुलांसह माहेरी गेली होती. घरात कुणीही नसल्याचे पाहून नैराश्यात असलेल्या अशोक यांनी टोकाचे पाऊल उचलले. घराच्या छताला दोरीने गळफास लावून त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. काहीवेळानंतर आई घरी परतली असता, समोरचा काळजाचा थरकाप उडवणारा प्रसंग पाहून त्यांनी हंबरडा फोडला. आरमोरीचे पोलिस निरीक्षक कैलास गवते यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.
कर्ज परतफेडीची विवंचना
अशोक बोधनकर यांच्यावर काही खासगी सावकार आणि सरकारी बँकांचे कर्ज होते. त्यांनी प्रामाणिकपणे अनेक कर्जाची परतफेडही केली होती. मात्र, कर्जाचा नेमका आकडा किती होता आणि त्यांना नेमकी कोणती धडकी भरली होती, की ज्यामुळे त्यांना आत्महत्येसारखे पाऊल उचलावे लागले, हे अद्याप गूढच आहे.
तोच दिवस, तसेच दुःख
१२ वर्षांपूर्वी, ११ मे २०१४ रोजी अशोकचे वडील देवराव बोधनकर यांचा मृतदेह वैरागड-आरमोरी मार्गावरील रामाळा शेतशिवारात संशयास्पद स्थितीत आढळला होता. आणि आज ११ मे रोजीच मुलाचा मृत्यू, या योगायोगाने गाव सुन्न झाले आहे. अशोक यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
Web Summary : A 38-year-old farmer, Ashok Bodhankar, from Vairagad, Gadchiroli, tragically ended his life due to debt. Twelve years prior, his father also died on the same day, leaving the village in shock. He is survived by his mother, wife, and two children. Police are investigating.
Web Summary : गढ़चिरौली के वैरागढ़ के 38 वर्षीय किसान अशोक बोधनकर ने कर्ज से तंग आकर आत्महत्या कर ली। बारह साल पहले, उसी दिन उनके पिता की भी मृत्यु हो गई थी, जिससे गांव में शोक है। उनके परिवार में माँ, पत्नी और दो बच्चे हैं। पुलिस जांच कर रही है।