आरमाेरी : काही दिवसांतच पावसाळ्याला सुरवात हाेणार आहे. त्यामुळे शहरातील प्रभाग १ मधील ओम साईनगर व गायत्री नगरात दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्येचे निराकरण करण्यासाठी उपाययाेजना कराव्यात, अशी मागणी नगरसेविका गीता सेलाेकर यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आरमाेरीच्या प्रभाग १ मधील ओम साईनगर व गायत्रीनगरात पावसाळ्यात पाणी साचत असल्याने बेटाचे स्वरूप प्राप्त हाेते. नगरातील अनेक नागरिकांच्या घरी पाणी शिरते. साचणाऱ्या पाण्याचा याेग्यप्रकारे निचरा हाेत नसल्याने तसेच या भागात रानतलाव असल्याने त्याचा सलंग नगराच्या भागाकडे देण्यात आला आहे. सलंगामधून पाणी साेडल्यानंतर हे पाणी दाेन्ही नगरात येते. त्यामुळे नगरातील पाणी कुठे जाणार, यासाठी रानतलावाच्या बाजूला दिलेला सलंग बंद करून काळा गाेटाच्या बाजूने असलेल्या नहराच्या बाजूने पाणी काढण्याची व्यवस्था करावी. यासाठी पावसाळा सुरू हाेण्यापूर्वी उपाययाेजना करावी. तसेच डाॅ. पिलारे यांच्या दवाखान्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात कचरा व झुडपे आहेत. या नाल्यातील गाळाचा उपसा लवकर करून दाेन्ही नगरातील नागरिकांची समस्या साेडवावी, अशी मागणी नगरसेविका सेलाेकर यांनी केली आहे.