'तुफान' धुळीत मिसळला ! झारखंडमध्ये माओवाद्यांना मोठा धक्का; जहाल नेत्यासह १२ जणांचा खात्मा
By संजय तिपाले | Updated: January 22, 2026 16:27 IST2026-01-22T16:27:18+5:302026-01-22T16:27:57+5:30
Gadchiroli : झारखंडमधील माओवादी कारवायांचा मास्टर माईंड व केंद्रीय समिती सदस्य अनल उर्फ तुफान, उर्फ पतिराम मांझी याच्यासह १२ माओवाद्यांना ठार करण्यात २२ जानेवारी रोजी सुरक्षा दलाला यश आले.

'Storm' turns into dust! Maoists suffer major setback in Jharkhand; 12 killed including Jahal leader
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: झारखंडमधील माओवादी कारवायांचा मास्टर माईंड व केंद्रीय समिती सदस्य अनल उर्फ तुफान, उर्फ पतिराम मांझी याच्यासह १२ माओवाद्यांना ठार करण्यात २२ जानेवारी रोजी सुरक्षा दलाला यश आले. झारखंडमध्ये माओवाद्यांच्या हिंसक कारवाया त्याच्या इशाऱ्यावरच चालत होत्या. त्याच्यावर तब्बल एक कोटीचे इनाम होते. कोब्रा कमांडोंनी सारंडाच्या घनदाट जंगलात त्याला अचूकपणे टिपले, त्यामुळे माओवाद्यांना मोठा धक्का बसला आहे.
अनल उर्फ तुफान, उर्फ पतिराम मांझी हा झारखंडच्या झरहाबाले (जि. गिरीडीह) येथील रहिवासी होता. तो आपल्या साथीदारांसह सारंडाच्या जंगलात मोठी बैठक घेणार असल्याची 'टीप' सुरक्षा दलांना मिळाली होती. आयजी साकेत सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कोब्रा २०३, २०५ आणि २०९ च्या जवानांनी जंगलात सापळा रचला , यावेळी माओवाद्यांना पळायलाही जागा उरली नाही. घनदाट जंगलात झालेल्या या चकमकीत कोब्रा जवानांनी आपल्या अचूक निशाण्याने नक्षलवाद्यांचे कंबरडेच मोडले.
मोठा शस्त्रसाठा जप्त
घटनास्थळावरून जवानांनी एके-४७ चा मोठा साठा तसेच स्फोटकेही हस्तगत केली आहेत. केंद्र सरकारने मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद मुळापासून उपटून फेकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, त्या लढाईतील झारखंडमधील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
दहशतीचे साम्राज्य उद्धवस्थ !
जवानांवर हल्ले, खून, स्फाेट,शस्त्रे लुटणे अशा गंभीर स्वरुपाच्या अनेक गुन्ह्यांत 'तुफान'चा सहभाग राहिलेला आहे.
तो केवळ हिंसक कारवायांत सहभागी नव्हता, तर तो पोलिसांना चकमा देण्यातही माहीर होता. हत्या,स्फोट आणि शस्त्रे लुटण्यासारख्या शेकडो गुन्ह्यांत तो वॉन्टेड होता. सारंडा आणि गिरिडीहच्या जंगलात त्याचे एकतर्फी साम्राज्य होते. मात्र, जवानांच्या शौर्यापुढे त्याच्या दहशतीचा अंत झाला आहे.