भाजप नेत्याच्या घरातून देशी दारूचा साठा जप्त! साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
By संजय तिपाले | Updated: November 12, 2025 20:42 IST2025-11-12T20:41:13+5:302025-11-12T20:42:08+5:30
Gadchiroli : मुद्देमाल जप्त करून आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीनंतर आरोपीला नोटीस देऊन सोडण्यात आले.

Stock of country liquor seized from BJP leader's house! Goods worth Rs 3.5 lakh seized
गडचिरोली : दारूविक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या विशेष मोहिमेत चामोर्शी तालुक्यातील वालसरा गावात ११ नोव्हेंबरला दुपारी १ वाजता मोठी कारवाई करण्यात आली. भाजपशी संलग्न असलेल्या स्थानिक नेत्याच्या घरातून तब्बल ३ लाख ६० हजार रुपयांचा देशी दारूचा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून, प्रशासनातील अधिकारीसुद्धा चकित झाले आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, वालसरा येथील रामचंद्र केशव भांडेकर ( ३४, रा. वालसरा ता. चामोर्शी) हा आपल्या नातेवाईकाच्या घरात मोठ्या प्रमाणात देशी दारू साठवून विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. पो.नि.अरुण फेगडे यांच्या मार्गदर्शनात पथकाने सापळा रचत कारवाई केली. पोलिसांनी पंचांसमक्ष झडती घेतल्यावर ३ लाख ६० हजार रुपये किमतीचे ९० मिली बाटल्यांचे ४५ खोके दारुसाठा आढळून आला.
मुद्देमाल जप्त करून आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीनंतर आरोपीला नोटीस देऊन सोडण्यात आले.
युवा मोर्चा पदाधिकारी व माजी जि. प. अध्यक्षांचे दीर
या प्रकरणातील आरोपी रामचंद्र भांडेकर हे भाजप युवा मोर्चाचे चामोर्शी तालुका उपाध्यक्ष आहेत. त्यांचे बंधू मधुकर भांडेकर हे भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष असून माजी जि.प. अध्यक्षा योगिता मधुकर भांडेकर यांचे ते दीर आहेत. तथापि, दारुबंदी असलेल्या गडचिरोलीत सत्ताधारी नेत्याकडेच दारु आढळल्याने खळबळ उडाली आहे.
"मूळात मी गडचिरोली शहरात व भाऊ गावी राहतो. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आमची लोकप्रियता कमी करण्यासाठी विरोधकांनी रचलेले हे षडयंत्र आहे. जप्त केलेली दारु इतरांच्या घरात आढळली, त्यामुळे यात भावाचा संबंध येतो कुठे, न्यायदेवता योग्य न्याय करेल."
- मधुकर भांडेकर, जिल्हाध्यक्ष भाजयुमो गडचिरोली