जावयाची हत्या; अंत्ययात्रेला गेलेल्या सासऱ्यांनाही काळाने गाठले ! कार नदीत कोसळून दोघांचा मृत्यू
By संजय तिपाले | Updated: January 20, 2026 18:20 IST2026-01-20T18:19:42+5:302026-01-20T18:20:14+5:30
Gadchiroli : नियतीचे चक्र किती क्रूर असावे, याचा दाहक अनुभव अहेरीकरांनी २० जानेवारी रोजी घेतला. दोन दिवसांपूर्वी जेहत्या झालेल्या चुलत जावयाच्या अंत्यविधीला उपस्थित राहून, डोळ्यातील आसवे पुसत परतणाऱ्या नातेवाईकांवर वाटेतच काळाने झडप घातली.

Son-in-law murdered; Time also overtook the in-laws who went to the funeral! Two die as car falls into river
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नियतीचे चक्र किती क्रूर असावे, याचा दाहक अनुभव अहेरीकरांनी २० जानेवारी रोजी घेतला. दोन दिवसांपूर्वी जेहत्या झालेल्या चुलत जावयाच्या अंत्यविधीला उपस्थित राहून, डोळ्यातील आसवे पुसत परतणाऱ्या नातेवाईकांवर वाटेतच काळाने झडप घातली. आलापल्ली - सिरोंचा महामार्गावर बोरीजवळील दिना नदीच्या पुलावरून कार खाली कोसळली. यात चुलत सासरे यादव विठ्ठलराव कोलपाकवार (७३, रा. आष्टी ता. चामोर्शी) व यादव यांचे चुलत बंधू सुनील मुरलीधर कोलपाकवार (५५, रा.बोरी ता.अहेरी) यांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जखमी आहेत.
रवींद्र तंगडपल्लीवार (४९, रा.आलापल्ली ता.अहेरी) हे १८ जानेवारी रोजी दुपारपासून बेपत्ता झाले होते, १९ जानेवारीला सकाळी सिरोंचा मार्गावर कालिमाता मंदिराजवळ त्यांचा मृतदेह आढळला होता. अज्ञात आरोपीने त्यांची धारदार शस्त्राने हत्या केली होती. या घटनेने आधीच खळबळ उडाली असताना, २० रोजी त्यांच्या अंत्यविधीसाठी त्यांचे नातेवाईक जमले होते. आष्टी येथील प्रसिद्ध किराणा व्यावसायिक यादव विठ्ठलराव कोलपाकवार (७३) हे आपल्या चुलत जावयाच्या अंत्यविधीसाठी आले होते. त्यांच्यासोबत पोस्टमास्तर असलेले त्यांचे चुलत बंधू सुनील मुरलीधर कोलपाकवार हेदेखील होते. अंत्यसंस्कार आटोपून सर्वजण कारने (एमएच ३३ व्ही - ८२४९) परतत होते. दुपारी दीडच्या सुमारास दिना नदीच्या पुलावरून कार नदीत कोसळली.
कठडे नसल्याने घात, कार थेट नदीत
दिना नदीचा हा पूल सध्या वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. पुलाला संरक्षक कठडे नसल्याने चालकाला अंदाज आला नाही. परिणामी, कार अनियंत्रित होऊन थेट खोल नदीत कोसळली. त्यामुळे प्रशासकीय हलगर्जीबद्दल तीव्र रोष व्यक्त होत आहे. दरम्यान, या पुलाशेजारी नवीन उंच पुलाचे बांधकाम सध्या प्रगतीपथावर सुरू आहे.
तीन जखमींवर उपचार सुरू
या भीषण अपघातात अभिजित यादव कोलपाकवार, अर्चना यादव कोलपाकवार आणि पद्मा सत्यनारायण कोलपाकवार हे तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने चंद्रपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
पोलिसांची युद्धपातळीवर मदत
घटनेची भीषणता पाहून परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. अहेरीचे पोलिस निरीक्षक हर्षल एकरे व उपनिरीक्षक देवेंद्र पटले यांनी तातडीने फौजफाट्यासह घटनास्थळ गाठले. त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात हलविले. दरम्यान, दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.