गडचिरोलीत पोहोचले मीठ तुटवड्याचे लोण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 05:00 AM2020-05-14T05:00:00+5:302020-05-14T05:00:59+5:30

माणसाच्या भोजनातील मीठ हे आवश्यक घटक मानले जाते. मिठाशिवाय भोजन अथवा कुठल्या खाद्यपदार्थाला चव येत नाही. मीठ सहज उपलब्ध होत असल्याने कुणीही साठाही करून ठेवत नाही. विशेष म्हणजे बरेच दुकानदार मिठाच्या चुंगड्या दुकानाच्या बाहेर ठेवतात. अशी परिस्थिती असताना गेल्या तीन-चार दिवसांपासून धानोरा, कुरखेडा, कोरची तालुक्याच्या काही भागात कोरोना संचारबंदीच्या काळात मिठाचा तुटवडा निर्माण होत असल्याची अफवा पसरली.

Shortage of salt reached Gadchiroli | गडचिरोलीत पोहोचले मीठ तुटवड्याचे लोण

गडचिरोलीत पोहोचले मीठ तुटवड्याचे लोण

Next
ठळक मुद्देदुप्पट भावाने विक्री : गरजेपेक्षा अधिक प्रमाणात मिठाची खरेदी करण्यासाठी ग्रामीण नागरिकांची झुंबड

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मिठाचा तुटवडा निर्माण झाला असून आता मिठ मिळणार नाही, अशी अफवा छत्तीसगडमधून गडचिरोली जिल्ह्यात पोहोचली. कोरची, कुरखेडा, धानोरा तालुक्यानंतर आता हे अफवेचे लोण चक्क गडचिरोली शहरापर्यंत पोहोचले. बुधवारी दिवसभर ग्रामीण नागरिकांनी गडचिरोलीच्या बाजारपेठेत मीठ खरेदीसाठी एकच गर्दी केली होती. त्याचा गैरफायदा घेत अनेक व्यापाऱ्यांनी दुप्पट दराने मिठाची विक्री केली.
माणसाच्या भोजनातील मीठ हे आवश्यक घटक मानले जाते. मिठाशिवाय भोजन अथवा कुठल्या खाद्यपदार्थाला चव येत नाही. मीठ सहज उपलब्ध होत असल्याने कुणीही साठाही करून ठेवत नाही. विशेष म्हणजे बरेच दुकानदार मिठाच्या चुंगड्या दुकानाच्या बाहेर ठेवतात. अशी परिस्थिती असताना गेल्या तीन-चार दिवसांपासून धानोरा, कुरखेडा, कोरची तालुक्याच्या काही भागात कोरोना संचारबंदीच्या काळात मिठाचा तुटवडा निर्माण होत असल्याची अफवा पसरली. अफवेचे हे लोण अर्ध्याअधिक जिल्ह्यात पसरले. परिणामी काही दिवसानंतर दुकानात मीठ उपलब्ध होणार नाही, असा अंदाज बांधून जिल्ह्यातील काही नागरिकांनी अधिकच्या मिठाची खरेदी करणे सुरू केले. काही व्यावसायिकांनी याचा फायदा घेत तुटवडा निर्माण होत असल्याच्या अफवेत भर घालून अधिक भावाने मीठाची विक्री केली.
शहरातील त्रिमूर्ती चौक परिसरातील बाजारपेठ तसेच आठवडी बाजारातील किराणा दुकान परिसरातून सायकल व दुचाकीवरून मीठ नेल्या जात असल्याचे दिसत होते. एक किलो मीठाचे पाकिट २० रुपयाला विकल्या जाते. मात्र बुधवारी हे पाकिट ३० रुपयाला घेतल्याचे काही महिलांनी लोकमतला सांगितले. तुटवडा असल्याने वरूनच भाव वाढले, असे दुकानदाराने सांगितल्याचे या महिला म्हणाल्या.
१६० रुपये किलोला मिळणारी मिठाची बॅग बुधवारी चक्क ४०० रुपये दराने विकली जात होती. विशेष म्हणजे माडेमुल येथील काही नागरिकांनी किराणा दुकानातून ४०० रुपयाला बॅग खरेदी केली. शहरातील काही विक्रेत्यांनी मात्र प्रामाणिकपणे मिठाचा तुटवडा नाही, गर्दी करू नका, असे सांगत मूळ दरात विक्री केली.

भरपूर मीठ उपलब्ध, अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई- जिल्हाधिकारी
गडचिरोली जिल्ह्याच्या काही तालुक्यांमध्ये मिठाचा तुटवडा असल्याची चुकीची अफवा पसरली असून जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा मिठाचा तुटवडा नाही. मोठ्या प्रमाणात मीठ साठा आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे खोट्या अफवांवर विश्वास ठेवून नागरिकांनी जास्तीच्या मिठाची खरेदी करू नये, असे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी स्पष्ट केले. कुरखेडा व धानोरा तालुक्यांमध्ये काही लोकांकडून चुकीची अफवा पसरवण्यात आली. मिठाचा तुटवडा असल्याबाबत कोणी अफवा पसरविल्यास त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत मीठ खरेदीसाठी रांगा लावू नयेत. अफवांवर विश्वास ठेवून लोकांनी जास्तीचे मीठ खरेदी केल्यामुळे संबंधित तालुक्यात मीठ संपल्याचे समोर आले आहे. दुकानदारांनी ग्राहकांकडून जास्तीचे पैसे घेऊन मीठ विक्री करू नये. येणाºया ग्राहकांना खरी माहिती द्यावी. कोणतीही अफवा पसरवत असल्याचे लक्षात आल्यास ताबडतोब प्रशासनाला कळवा आणि त्याबाबत खात्री करून घ्या, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.

फंटर ग्राहकांच्या माध्यमातून कारवाईची गरज
मीठ हा आवश्यक खाद्यपदार्थ असल्याने तो मिळाला नाही तर कसे? या भितीपोटी ग्राहक अधिकचे पैसे देऊनही ते खरेदी करत आहेत. पण याबद्दल तक्रार देण्याच्या भानगडीत पडण्यास कोणीही नागरिक तयार नाही. पुढेही याबाबतच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त होतील याची शाश्वती नाही. त्यामुळे प्रशासन व पुरवठा विभागाने स्वत:च पुढाकार घेऊन फंटर ग्राहकाच्या माध्यमातून गडचिरोली शहरासह जिल्हाभरात मिठाच्या या काळाबाजाराची पोलखोल करावी आणि जादा दराने मिठाची विक्री करणाऱ्या संबंधित दुकानदारांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा सूज्ञ नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Web Title: Shortage of salt reached Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.