आंध्र प्रदेशात सात नक्षल्यांचा खात्मा ! मृतांमध्ये 'टेक शंकर'चाही समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 13:00 IST2025-11-20T12:56:25+5:302025-11-20T13:00:02+5:30
Gadchiroli : गेल्या काही महिन्यांत आंध्र-ओडिशा सीमाभागात नक्षलवादी हालचाली वाढल्याचे सुरक्षादलांना माहिती मिळाली होती. जंगलात नवीन अड्डे उभारणे, जुन्या कॅडरला सक्रिय करणे आणि छत्तीसगडकडे येणाऱ्या गटांना प्रवेश देण्याची हालचाल सुरू होती.

Seven Naxalites killed in Andhra Pradesh! 'Tech Shankar' among the dead
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य व जहाल नक्षल कमांडर माडवी हिडमा, पत्नी राजे ऊर्फ राजक्का आणि इतर चार माओवादी १८ नोव्हेंबरला छत्तीसगड आंध्रप्रदेश सीमेवर चकमकीत ठार झाले होते. पाठोपाठ दुसऱ्याच दिवशी आंध्रप्रदेश-ओडिशा सीमेजवळ सुरक्षा दलांनी सात जहाल माओवाद्यांना कंठस्नान घातले. मृतांमध्ये मेटुरू जोगाराव ऊर्फ 'टेक शंकर' याचा समावेश आहे.
टेक शंकर हा आंध्र-ओडिशा बॉर्डर स्पेशल झोनल कमिटीच्या तांत्रिक शाखेचा प्रमुख होता. त्याने मागील काही वर्षात छत्तीसगड व आंध्र-ओडिशा भागात लैंडमाइन व स्फोटक हल्ल्यांचे डिझाइन आणि अंमलबजावणी केली होती. शस्त्रनिर्मिती, संचार प्रणाली, स्फोटक रचना या बाबतीत त्याला विशेष कौशल्य असल्यामुळे संघटनेचा टेक्निकल प्रमुख मानला जात असे.
आंध्र प्रदेशात स्थलांतराचा प्रयत्न
सध्या छत्तीसगडमधील दबावामुळे काही नक्षल गट आंध्र प्रदेशात स्थलांतर करण्याचा प्रयत्न करत आहेत. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसरात सखोल सर्च ऑपरेशन्स सुरू केले आहेत. या कारवाईने माओवादी संघटनेच्या तांत्रिक पायाभूत संरचनेला मोठा धक्का बसला आहे. सीमेवरील वाढती नक्षलवादी हालचाल रोखण्यासाठी या कारवाया अतिशय निर्णायक मानल्या जात आहेत.
नक्षलवादी हालचाली वाढल्या
गेल्या काही महिन्यांत आंध्र-ओडिशा सीमाभागात नक्षलवादी हालचाली वाढल्याचे सुरक्षादलांना माहिती मिळाली होती. जंगलात नवीन अड्डे उभारणे, जुन्या कॅडरला सक्रिय करणे आणि छत्तीसगडकडे येणाऱ्या गटांना प्रवेश देण्याची हालचाल सुरू होती. याच पार्श्वभूमीवर ग्रेहाउंड्स आणि इतर सुरक्षा पथकांनी मंगळवारी मोठ्या प्रमाणावर ऑपरेशन सुरू केले, त्याच मोहिमेचा परिणाम म्हणून बुधवारी जोरदार चकमक झाली.
आंध्रप्रदेशात ५० माओवाद्यांना अटक
गेल्या काही दिवसांत एनटीआर, कृष्णा, काकीनाडा, कोनसीमा आणि एलुरू जिल्ह्यांतून एकूण ५० माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे. यात केंद्रीय समिती, राज्य समिती, एरिया कमिटी व प्लाटून स्तरावरील महत्त्वाच्या सदस्यांचा समावेश आहे. कारवाईदरम्यान सुरक्षा दलांनी ४५ रायफल/बंदुका, २७२ जिवंत काडतुसे, २ मॅगझीन, ७५० ग्रॅम वायर, तांत्रिक उपकरणे आणि इतर दस्तऐवज जप्त केले आहेत.