वरिष्ठ नेत्यांचा बळी गेला.. शेकडो नक्षलवादी मारले गेले; त्यामुळे शस्त्रसंधी हाच एकमेव पर्याय ! नक्षलनेता भूपती भूमिकेवर ठाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 13:11 IST2025-10-04T13:10:54+5:302025-10-04T13:11:55+5:30
जगनच्या टीकेवर पलटवार : गडचिरोली व उत्तर बस्तर डिव्हिजनकडून समर्थन

Senior leaders were killed.. Hundreds of Naxalites were killed; Therefore, a ceasefire is the only option! Naxal leader Bhupathi stands firm on his position
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नक्षल चळवळीतील सर्वोच्च नेत्यांमध्ये आता थेट मतभेद उघड झाले आहेत. सध्याच्या परिस्थितीत सशस्त्र लढा शक्य नाही, शस्त्रसंधी हाच एकमेव पर्याय आहे, असा पुनरुच्चार माओवादी संघटनेचा पॉलिट ब्यूरो व केंद्रीय समिती सदस्य मल्लोजुला वेणुगोपाल ऊर्फ अभय ऊर्फ भूपती याने करून आपल्या सहकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. त्याच्या या भूमिकेला विरोध करणाऱ्या तेलंगणा राज्य समिती प्रवक्ता जगनला त्याने संघटनेच्या ठरावांची आठवण करून दिली आहे. इतिहासात पहिल्यांदाच नक्षलवादी संघटनेतील फूट एवढ्या ठळकपणे समोर आली असून, महाराष्ट्र-छत्तीसगडमधील मोहिमा जोमाने सुरू असतानाच ही घडामोड चळवळीतील घसरणीचे आणखी दर्शन घडवते.
भूपतीने तेलुगू भाषेत काढलेल्या नव्या पत्रकात जनताच अंतिम न्यायाधीश आहे, असे ठामपणे नमूद करत शस्त्रसंधीवर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. महासचिव नंबाला केशवरावने शांतता चर्चेसाठी पुढाकार घेतल्याची आठवण करून देत भूपतीने दीर्घकालीन जनयुद्ध ही जुनी रणनीती आता अप्रासंगिक ठरली असून, जनतेत जाऊन जनाधार वाढवणे हाच पर्याय आहे, असेही म्हटले आहे.
गेल्या दशकात महासचिवांसह अनेक वरिष्ठ नेत्यांचा बळी गेला, शेकडो नक्षलवादी मारले गेले किंवा आत्मसमर्पण केले. तळागाळात जनाधार वाढण्यात अपयश आल्याने चळवळ चारही बाजूंनी कोसळत असल्याचेदेखील भूपतीने मान्य केले आहे.
भूपतीच्या भूमिकेला वाढते समर्थन
- भूपतीच्या शस्त्रसंधीच्या भूमिकेला गडचिरोली डिव्हिजन आणि छत्तीसगडमधील उत्तर बस्तर डिव्हिजनने पाठिंबा दिला आहे.
- २७ व २८ सप्टेंबरला निघालेल्या पत्रकाद्वारे २ प्रवक्ता सुखदेव कवडो, कमलसाय वेलादी, कंपनी १० चा कमांडर निखिल आणि टेक्निकल विभाग प्रमुख मैनू यांनी संयुक्त भूमिका जाहीर केली.
- यामुळे चळवळीतील फूट अधिकृतपणे अधोरेखित झाली असून, त्याच पार्श्वभूमीवर २ ऑक्टोबरला बिजापूर जिल्ह्यात तब्बल १०३ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.
- तथापि, सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या काही ४ दिवसांत भूपती स्वतः काही महत्त्वाच्या सदस्यांसह तेलंगणातील हैदराबाद येथे आत्मसमर्पण करू शकतो.