जादा दराने रासायनिक खते विक्री, गडचिरोलीतील सात दुकानांचे परवाने केले कायमचे रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 17:43 IST2025-08-11T17:42:34+5:302025-08-11T17:43:52+5:30
कृषी विभागाची कारवाई : कृषी सेवा केंद्रांमधून ७४ लाखांची मुदतबाह्य कीटकनाशके जप्त

Selling chemical fertilizers at exorbitant rates, licenses of seven shops in Gadchiroli permanently cancelled
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शासनाने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा जादा दराने रासायनिक खतांची विक्री करणाऱ्या, तसेच साठापुस्तक अद्ययावत न ठेवणाऱ्या सात कृषी केंद्रांचे परवाने कायमचे रद्द करण्यात आले. कृषी विभागाकडून ही कारवाई आठवडाभरात करण्यात आली. विशेष म्हणजे, ७४ लाख रुपये किमतीची मुदतबाह्य कीटकनाशके व तणनाशके कृषी विभागाने जप्त केली. ती नष्ट करण्याची कार्यवाही सुरू आहे.
अधिक नफा प्राप्त करण्यासाठी कृषी केंद्रचालक जादा दराने खते, कीटकनाशके, तणनाशके तसेच बियाणांची विक्री करतात. याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतो. कृषी विभागाकडून वारंवार सूचना देऊनही काही केंद्रचालक मनमानीपणे जादा दराने कृषी निविष्ठांची विक्री करतात. अशा केंद्रचालकांवर कृषी विभागाची यंदाच्या हंगामात सुरूवातीपासूनच करडी नजर आहे. त्यानुसार कृषी विभागाने बाराही तालुक्यात गुणनियंत्रक निरीक्षकांची नेमणूक केली आहे.
कृषी केंद्रचालकांकडून केल्या जाणार गैरव्यवहाराची तसेच आर्थिक लुटीविरोधात तक्रार करण्यासाठी मोबाइल क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तक्रारी कराव्या, असे कृषी विभागाने कळविले आहे.
२३ केंद्रचालकांना बजावली नोटीस
- कृषी विभागाच्या वतीने केंद्रचालकांची तपासणी करून परवाने रद्द, निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. याशिवाय देसाईगंज व कुरखेडा तालुक्यातील प्रत्येकी दोन अशा ४ सुनावण्या पूर्ण झालेल्या आहेत.
- खत साठा तफावत व तक्रारी आलेल्या २३ केंद्रचालकांना या आठवड्यात नोटीस बजावलेली आहे. त्यांच्याकडून समाधानकारक खुलासे न आल्यास पुन्हा सुनावणी घेऊन आवश्यक कारवाई केली जाणार आहे.
का झाली कारवाई?
कृषी केंद्र चालकांकडून ई-पॉस मशीनवर खतांचा साठा ताळमेळ न ठेवणे, जादा दराने विक्री करणे, साठा पुस्तक अद्ययावत न करणे, साठा फलक न लावणे, नियमानुसार खताची विक्री न करणे आदी कारणांमुळे कृषी विभागाने कारवाई केली.
या क्रमांकावर करावी तक्रार
कृषी केंद्र चालकांकडून रायायनिक खतांची चढ्या दराने विक्री होत असल्यास किंवा कोणताही गैख्यवहार सुरू असल्यास शेतकऱ्यांनी तत्काळ कृषी विभागाशी संपर्क साधा. यासाठी ८२७५६९०१६९ क्रमांकावर तक्रार करावी, तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
येथे केली कारवाई
कृषी विभागाने चामोर्शी तालुक्यात रासायनिक खत विक्रीचे दोन परवाने व कीटकनाशक विक्रीचा १ परवाना असे तीन परवाने रद्द केले, तर खते विक्रीचे दोन परवाने निलंबित केले. धानोरा तालुक्यात बियाणे विक्रीचे दोन परवाने व खत विक्रीचा एक परवाना असे तीन परवाने रद्द केले. आरमोरी तालुक्यात रासायनिक खते विक्रीचा एक परवाना रद्द केला. कृषी विभागाकडून केंद्रांची तपासणी केली जात असून कारवाई सुद्धा सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
"कृषी केंद्र धारकांनी शासनाने ठरवून दिलेल्या दरातच रासायनिक खतांची विक्री करावी. प्रत्येक शेतकऱ्याला पक्की पावती द्यावी आणि कोणत्याही गैरकृत्यापासून दूर राहावे. केंद्राविरोधात कोणतीही तक्रार आल्यास व चौकशीत दोषी आढळल्यास कृषी केंद्र परवाना रद्द करण्यापासून ते फौजदारी गुन्हा दाखल करण्यापर्यंतची कारवाई केली जाईल."
- प्रीती हिरळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी