नऊ तास चाललेल्या भीषण चकमकीत सुरक्षा दलांना मोठे यश; ७ माओवाद्यांचा केला खात्मा
By संजय तिपाले | Updated: December 3, 2025 18:16 IST2025-12-03T18:14:54+5:302025-12-03T18:16:37+5:30
नऊ तास चकमक : घटनास्थळी मोठा शस्त्रसाठा आढळला, सर्च ऑपरेशन सुरुच

Security forces achieve major success in fierce nine-hour encounter; 7 Maoists killed
गडचिरोली : छत्तीसगडच्या पश्चिम बस्तर विभागातील बिजापूर–दंतेवाडा अंतरजिल्हा सीमेवर ३ डिसेंबर रोजी सकाळपासून सुरू झालेली माओवाद्यांविरोधातील निर्णायक कारवाई संध्याकाळपर्यंत सुरूच राहिली. सलग नऊ तास चाललेल्या भीषण चकमकीत सुरक्षा दलांनी मोठे यश मिळवत सात माओवाद्यांना ठार केले. मात्र, दोन धैर्यवान डीआरजी जवानांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी या चकमकीत प्राण गमावले. एक जवान जखमी झाला.
बिजापूरचे पोलिस अधीक्षक डॉ. जितेंद्र यादव यांच्या माहितीनुसार, बिजापूर व दंतेवाडीतील माओवादविरोधी विशेष पथक (डीआरजी), एसटीएफ, कोब्रा, आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त पथकाकडून ३ रोजी पहाटेपासून सर्च ऑपरेशन राबविण्यात येत होते. सकाळी नऊ वाजताच सीमेवरील घनदाट जंगल पट्ट्यात माओवाद्यांनी गोळीबार करून जवानांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.
सुरक्षा दलांनी आक्रमक पवित्रा घेत माओवाद्यांच्या दबा धरून बसलेल्या तळांवर जोरदार प्रत्युत्तर केले. अधून- मधून दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरुच होता. घटनास्थळावरुन आतापर्यंत सात माओवादी मृतदेह मिळाले असून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
एसएलआर रायफल्स, काडतुसे, डेटोनेटर आणि अन्य माओवादी साहित्य जप्त करण्यात आले आहे.
दोन जवान शहीद, एक जखमी
या कारवाईदरम्यान बिजापूरच्या डीआरजी पथकातील मोनू वडाडी, दुकारू गोंडे हे दोन जवान शहीद झाले.याशिवाय जवान सोमदेव यादव जखमी झाले असून प्राथमिक उपचार करण्यात आले. ते सध्या सुरक्षित आणि धोक्याबाहेर आहेत.
माओवादविरोधी अभियान अधिक तीव्र
बस्तर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक पी. सुंदरराज पट्टलिंगम यांनी परिसरात माओवादविरोधी अभियान अधिक तीव्र केले असल्याचे सांगितले. अतिरिक्त कुमक तातडीने रवाना करण्यात आली असून जंगल पट्ट्याला पूर्णपणे घेराव घातला आहे. माओवाद्यांचे उरलेले गट बाहेर पडू नयेत यासाठी कडक नाकेबंदी करण्यात आली आहे.
लढाई निर्णायक वळणार
बिजापूर–दंतेवाडा सीमेवरील ही कारवाई बस्तरातील मोठ्या माओवादी तुकडीला दिलेला जोरदार धक्का मानला जात आहे. सलग ९ तासांच्या चकमकीने जंगल परिसर हादरुन गेला होता. आजची कारवाई पाहता सुरक्षा दलांनी पश्चिम बस्तरातील माओवादी दबदबा अत्यंत कमकुवत करण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल उचलले असल्याचे मानले जात आहे.