रायपुरे हत्याप्रकरणी अखेर न. प. सभापती प्रशांत खोब्रागडेला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 05:00 IST2021-07-10T05:00:00+5:302021-07-10T05:00:50+5:30
या प्रकरणात यापूर्वी चार आरोपींना गडचिरोली जिल्ह्यातून अटक झाली होती. त्यांना पाेलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्यांनी सुपारी घेऊन हे हत्याकांड घडविल्याची कबुली दिली. येत्या १३ जुलैपर्यंत ते चारही जण पीसीआरमध्ये आहेत. प्रशांत खोब्रागडेला शनिवारी न्यायालयापुढे हजर करून पीसीआर मिळविला जाईल, असे तपास अधिकारी एपीआय शरद मेश्राम यांनी सांगितले.

रायपुरे हत्याप्रकरणी अखेर न. प. सभापती प्रशांत खोब्रागडेला अटक
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : शहराच्या फुले वाॅर्डात २४ जून राेजी झालेल्या दुर्याेधन रायपुरे यांच्या हत्येप्रकरणी पाचवा आणि मुख्य आरोपी म्हणून गडचिरोली नगर परिषदेचे वित्त व नियोजन सभापती तथा फुले वॉर्डचे नगरसेवक प्रशांत खोब्रागडे यांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्यांनीच सुपारी देऊन राजकीय द्वेषातून हे हत्याकांड घडविल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे.
या प्रकरणात यापूर्वी चार आरोपींना गडचिरोली जिल्ह्यातून अटक झाली होती. त्यांना पाेलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्यांनी सुपारी घेऊन हे हत्याकांड घडविल्याची कबुली दिली. येत्या १३ जुलैपर्यंत ते चारही जण पीसीआरमध्ये आहेत. प्रशांत खोब्रागडेला शनिवारी न्यायालयापुढे हजर करून पीसीआर मिळविला जाईल, असे तपास अधिकारी एपीआय शरद मेश्राम यांनी सांगितले. या गुन्ह्यात आरोपींचा माग काढण्यासाठी एसडीपीओ प्रणिल गिल्डा यांच्यासह शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले, एलसीबीचे निरीक्षक उल्हास भुसारी, एपीआय सगने यांचीही मोलाची मदत झाल्याचे एपीआय मेश्राम यांनी सांगितले.
पाच लाखांत झाला सौदा
येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीतील राजकीय अडथळा बाजूला सारण्याच्या दृष्टीने संभाव्य उमेदवार म्हणून दुर्योधन रायपुरे यांना संपविण्याचा कट रचण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना कळली. आरोपी खोब्रागडे याने गोंदिया जिल्ह्यातील त्या चार आरोपींना पाच लाखांत ही सुपारी दिली. त्यापैकी घटनेच्या दिवशी खोब्रागडे तिथे हजर नव्हते. मात्र काम फत्ते झाल्यानंतर सुपारी घेणाऱ्यांना ५० हजार रुपये देण्यात आले.