उत्पादन खर्च एकरी 20 हजार, हाती मिळतात 25 हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 05:00 IST2020-11-07T05:00:00+5:302020-11-07T05:00:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : शेती उत्पादन खर्चात दरवर्षी वाढ हाेत आहे. दरम्यान शेतमालाच्या भावातही वाढ हाेत आहे. मात्र ...

उत्पादन खर्च एकरी 20 हजार, हाती मिळतात 25 हजार
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : शेती उत्पादन खर्चात दरवर्षी वाढ हाेत आहे. दरम्यान शेतमालाच्या भावातही वाढ हाेत आहे. मात्र या वाढीमध्ये बरीच तफावत दिसून येत असल्याने दिवसेंदिवस शेती व्यवसाय ताेट्यात चालला आहे. धान शेतीमध्ये प्रती एकरी २० हजार रुपयांचा खर्च येताे. तर धान विक्री केल्यानंतर २५ ते २६ हजार रुपये मिळतात. वर्षभर देखरेख व परिश्रम केल्यानंतर शेतकऱ्यांच्या हाती नफ्यापाेटी केवळ पाच ते सहा हजार रुपये लागतात.
गडचिराेली जिल्ह्यात जवळपास दीड लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामात धानाची लागवड केली जाते. बरेेच शेतकरी अत्याधुनिक पद्धतीने धानाची शेती करीत असल्याने उत्पादन खर्च वाढला आहे. कीटकनाशके, खत आदींच्या किमती वाढल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी हैराण झाले आहेत. त्यात अवकाळी वादळी पाऊस, पूरपरिस्थिती, खरीप हंगामातील पिकांवर विविध राेगांचा प्रादुर्भाव आदी कारणामुळे शेतकऱ्यांचे उत्पादनही घटत आहे.
कीटकनाशकात ४०० ते ५०० रुपये वाढ
सन २०१६-१७ मध्ये धान व इतर पिकाच्या राेग नियंत्रणासाठीच्या कीटकनाशकाला प्रती लीटर ७०० ते ८०० रुपये द्यावे लागत हाेते. यंदा १२०० रुपये दर घेतला जात आहे.
गडचिराेली जिल्ह्यातील शेती ही बहुतांश पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यात निसर्गाची माेठी भूमिका आहे. निसर्गाने चांगली साथ दिल्यास शेतकऱ्यांना धान शेतीत थाेडाफार नफा मिळताे. मात्र निसर्गाची अवकृपा झाल्यास उत्पादन खर्चही भरून निघत नाही. निसर्गाने चांगली साथ दिल्यानंतर उत्पादन खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हाती केवळ पाच ते सहा हजार रुपये लागतात.
- पप्पू मुनघाटे
शेतकरी, काटली
यावर्षी आपण शेतात जड व मध्यम प्रतीच्या धानाची लागवड केली. सुरूवातीला राेगामुळे धानपिकावर परिणाम झाला. त्यानंतर परतीच्या पावसाने धानपिकाची वाट लावली. महसूल विभागाच्या वतीने सर्वेक्षण झाले आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पुरेशी मदत द्यावी. हमीभावात वाढ करावी.
- वामन भाेयरशेतकरी, वाकडी